Cages and cameras have been installed to capture tigers.
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा गेल्या पाच महिन्यांपासून वनविभागाला हुलकावणी देत असलेल्या पट्टेरी वाघाने वरवंटी आणि आपसिंगा गावांच्या शिवारात दर्शन दिल्याने व वाघ गावाच्या इतका जवळ आल्यामुळे वनविभागाने तातडीने या भागात पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे लावण्यास सुरुवात केली आहे.
जानेवारी महिन्यात येडशीच्या अभयारण्यात पहिल्यांदा या वाघाचे दर्शन झाले होते. बिबट्याच्या संशयाने लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये हा पट्टेरी वाघ कैद झाल्यानंतर मराठवाड्यातील पर्यावरणप्रेमींचे लक्ष धाराशिवकडे वेधले गेले. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर येथून आलेल्या या वाघाने काही काळ रामलिंग अभयारण्यात आश्रय घेतला आणि वन्यजीवांची शिकार केली. त्यानंतर, त्याने शेतातील पाळीव जनावरांवर हल्ला करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली.
मानवी संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने या वाघाला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी ताडोबा आणि पुण्याहून प्रशिक्षित पथकेही दाखल झाली. मात्र, या दोन्ही पथकांना वाघाला पकडण्यात यश आले नाही आणि तो त्यांना हुलकावणी देत राहिला. त्यानंतर तो धाराशिवलगतच्या बार्शी (सोलापूर) आणि बीड जिल्ह्यांच्या हद्दीत वावरत असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी तो दिसल्याच्या बातम्याही येत होत्या.
या संदर्भात वनमंत्री नाईक यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीबाबत निर्देश दिले आहेत. तसेच राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीमती शोमिता विश्वास, छत्रपती संभाजीनगर विभागाचे वनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा व जगदीश एडलावार यांच्याशी संपर्क साधून वाघ पकडण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही त्वरित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत, असे भाजप आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.