

Striped tiger seen again near Dharashiv
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा मागील पाच महिन्यांपासून वनविभागाला हुलकावणी देणाऱ्या पट्टेरी वाघाचे आज पुन्हा एकदा धाराशिवजवळील वरवंटी गावच्या शिवारात गुरुवारी (दि.४) दर्शन झाले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे.
यंदाच्या जानेवारी महिन्यात येडशीच्या अभयारण्यात सर्वप्रथम या वाघाचे दर्शन झाले होते. बिबट्याच्या संशयाने वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात हा पट्टेरी वाघ कैद झाला आणि मराठवाड्यातील पर्यावरणप्रेमींचे लक्ष धाराशिवकडे वेधले गेले.
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वरहून आलेला हा वाघ नेमका कधी आला, याची माहिती अद्याप कोणालाही नाही. येथे आल्यानंतर काही काळ या वाघाने रामलिंग अभयारण्यात आश्रय घेतला आणि वन्यजीवांची शिकार केली. त्यानंतर मात्र त्याने शेतातील पाळीव जनावरांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्याच्या वावराचा परीघ वाढत गेल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली.
स्थलांतराचे प्रयत्न अयशस्वी वाघाचा मानवी संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने या वाघाला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ताडोबा आणि पुण्याहून प्रशिक्षित पथके दाखल झाली. मात्र या दोन्ही पथकांना वाघाला पकडण्यात यश आले नाही आणि तो त्यांना हुलकावणी देत राहिला.