BJP goes on hunger strike to block Maha vikas aaghadi road block protest
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा शहरांतर्गत होणाऱ्या नगरोत्थान रस्त्यांना कार्यारंभ आदेश आणि स्थगिती पाठोपाठ मिळाल्याने सत्ताधारी तसेच विरोधी आघाडीतील भावी नगरसेवक तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना मोठी पर्वणी ठरली आहे. हे रस्ते झालेच पाहिजेत... बाकी आम्हाला काही माहिती नाही,' असे सांगत दोन्ही बाजूंनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने झाली. यात महाविकास आघाडीने रस्ता रोको आंदोलन केले, तर भाजपतर्फे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांची ब्रिगेड उतरविण्यात आली.
महाविकास आघाडीतर्फे या रस्तेकामासाठी दोन वर्षांत सातत्याने आंदोलने केली जात आहेत. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दोन्ही आंदोलनावेळी मविआच्या उपो पणकर्त्यांची भेट घेऊन लवकरच रस्ते काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर हा प्रश्न मिटेल असे संकेत आठ दिवसांपूर्वी मिळाले. सरकारने १४० कोटी रुपयांच्या या ५९ रस्त्यांच्या कामांचा कार्यारंभ आदेश दिला.
त्यामुळे साहजिकच भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आता लवकरच या रस्ते कामाचा प्रारंभ मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्याचे जाहीर केले. लगोलग भाजपने शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे आभार मानणारे फलकही लावले. मात्र दोन दिवसांतच पालकमंत्र्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत या कामाला स्थगिती दिली. त्यानंतर पुन्हा वातावरण पेटले. अर्थात पेटणे अपेक्षित होते भाजप विरुद्ध शिवसेना म्हणजे दोन्ही सत्ताधारी पक्षातच. प्रत्यक्षात मात्र भाजपने ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या सांगण्यावरून पालकमंत्री सरनाईक यांनी गैरसमज करून घेतला आणि स्थगिती दिली, अशी भूमिका घेत ठाकरे गटावर निशाणा साधला.
यानंतर महाविकास आघाडीनेही जोरदार पलटवार करत गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही स्थगिती उठविण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी सकाळी ११ वाजता एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अचानक रस्तारोको आंदोलन केले. 'सरकार तुमचेच असताना तुमच्या कामाला स्थगितीही तेच देत असताना विनाकारण ठाकरे शिवसेनेवर आरोप का?' असा सवाल करत सोमनाथ गुरव, अग्निवेश शिंदे, सिद्धार्थ बनसोडे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले.
त्याच वेळी भाजपतर्फे महिला आघाडीला रिंगणात उतरविण्यात आले. या महिलांनी 'सामान्य धाराशिवकर' या बॅनरखाली बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना उपो षणाचा इशारा देणारे निवेदन दिले. त्यानंतर गुरुवारी त्यांनी उपोषणही सुरू केले. या मंडपाच्या बाजूला भाजपचे अमित शिंदे, अभय इंगळे यांच्यासह अन्य नेत्यांची दिवसभर हजेरी होती. नगराध्यक्षपद इच्छुक महिलांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर या महिलांनी 'बाकीचे आम्हाला काही माहिती नाही. धाराशिव शहरातील रस्ते कामांची स्थगिती उठवावी, अशी एकमुखी मागणी केली. एकंदर दोन्ही आंदोलने पाहता भावी तसेच इच्छुकांचीच संख्या अधिक होती.