अपक्ष उमेदवार तथा आ. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय यांनी मल्हार पाटील यांची भेट घेतली.  pudhari photo
धाराशिव

Dharashiv Politics : सत्ता स्थापनेचे नाट्य रंगतदार; आ. तानाजी सावंत यांना धक्का

पुतणे धनंजय यांची भाजपशी जवळीक

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला असून भाजपचे प्रयत्न फळाला येताना दिसत आहेत. 19 सदस्यसंख्या असलेल्या भाजपला राष्ट्रवादीचे सहा सदस्य तसेच तीन अपक्षांचा पाठिंबा मिळाल्याने 28 ही ‌‘मॅजिक फिगर‌’ गाठल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, अपक्ष उमेदवार धनंजय सावंत यांनी काकांविरोधात बंड पुकारत थेट भाजपशी सलगी साधल्याने आ. तानाजी सावंत यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. मंगळवारी सकाळी धनंजय यांनी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांची भेट घेतल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. या घडामोडीनंतर भाजपचे सत्तास्थापनेचे गणित अधिक बळकट झाल्याची चर्चा रंगली आहे.

जिल्हा परिषदेत बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपने निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सर्व सदस्यांना सहलीवर पाठविल्याची माहिती आहे. यात शिवसेनेच्या दोन सदस्यांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. मागील दोन दिवसांत दोन अपक्षांचा पाठिंबा मिळविल्यानंतर धनंजय सावंत यांच्या भूमिकेमुळे समीकरणे झपाट्याने बदलली आहेत.

शिवसेनेचे 15 सदस्य विजयी झाले असले तरी त्यांपैकी दोन सदस्यांनी भाजपसोबत जाणे पसंत केल्याने आ. सावंत यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेला सात तर काँग्रेसला तीन जागा मिळाल्या आहेत.

भाजपकडे बहुमताचे आवश्यक संख्याबळ जमा झाल्याचे संकेत मिळत असून आता अधिकृत सत्तास्थापनेचा मुहूर्त कधी निघणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेतील पुढील राजकीय घडामोडी अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT