रामेश्वर : जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवरील पत्रे उडाले. यामुळे विद्यार्थी सुरक्षा धोक्‍यात आली आहे.  pudhari photo
धाराशिव

Dharashiv Rameshwar ZP school : पत्रे उडाले; प्रशासनाची झोप उडणार कधी?

रामेश्वरच्या जिल्‍हा परिषद शाळेची दुरवस्था; दोन वर्गांतील विद्यार्थी एकाच खोलीत

पुढारी वृत्तसेवा

भूम : तालुक्यातील रामेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवरील पत्रे पाच-सहा दिवसांपूर्वी उडून गेल्याने दोन वर्गांतील विद्यार्थ्यांना एकाच खोलीत बसवून शिक्षण घ्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला असतानाही प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याने पालकांमधून संताप व्यक्त होत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष अर्चनाताई दराडे यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली.

शाळेच्या इमारतीची यापूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, दुरुस्तीनंतर अल्पावधीतच पत्रे उडून गेल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदाराने वापरलेले साहित्य, कामाची गुणवत्ता आणि तांत्रिक तपासणी याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

विशेष म्हणजे, या कामासाठी तीन वर्षांचा देखभाल कालावधी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या कालावधीतच पत्रे उडाल्याने देखभालीची जबाबदारी कोणाची, असा सवाल उपस्थित झाला आहे. काम निकृष्ट आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करून त्याच्याकडून दुरुस्तीचा खर्च वसूल करावा, अशी मागणी आहे.

जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू असताना विद्यार्थ्यांना सुरक्षित वर्गखोलीही उपलब्ध होत नसेल, तर पालकांनी सरकारी शाळांवर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पत्रे उडून पाच-सहा दिवस उलटूनही तातडीची व्यवस्था न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तात्पुरती डागडुजी न करता शाळेच्या इमारतीच्या कामाची गुणवत्ता तपासून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.

तीन वर्षांची देखभाल, मग जबाबदार कोण?

  • शाळेच्या इमारतीची यापूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती.

  • दुरुस्तीनंतर अल्पावधीतच पत्रे उडाल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न.

  • तीन वर्षांचा देखभाल कालावधी असल्यास ठेकेदाराची जबाबदारी काय?

  • कामाची तांत्रिक तपासणी झाली होती का?

  • निकृष्ट काम आढळल्यास ठेकेदारावर कारवाई करून खर्च वसूल करण्याची मागणी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT