Bhum police take action against two-wheeler drivers, remove noisy silencers.
भूम, पुढारी वृत्तसेवा : शहरातील वाढत्या कर्णकर्कश सायलेन्सरच्या आवाजाला आळा घालण्यासाठी भूम पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ८ बुलेटचालकांवर कारवाई करत, त्यांच्या वाहनांवरील कर्णकर्कश सायलेन्सर काढून घेतले आणि त्याजागी कंपनीचे मूळ सायलेन्सर बसवून त्यांना समज देऊन सोडून दिले.
गेल्या काही दिवसांपासून भूम शहरात रात्री-अपरात्री बुलेट चालकांकडून कर्णकर्कश आवाजाचा सायलेन्सर वापरला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत होत्या. बंदुकीतून गोळी सुटल्याप्रमाणे किंवा फटाके फुटल्याप्रमाणे येणाऱ्या या आवाजामुळे रात्री गाढ झोपेत असलेले नागरिक दचकून जागे होत होते. भरधाव वेगाने जाणाऱ्या बुलेटस् आणि त्यातून येणारा हा आवाज यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.
या वाढत्या तक्रारींची दखल घेत, भूम पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी स्वतः या कारवाईसाठी विशेष लक्ष दिले. शहरातील विविध ठिकाणी अचानकपणे कारवाई करत पोलिसांनी ८ बुलेटचालकांना रंगेहाथ पकडले. त्यांच्या दुचाकींसह त्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांसमोरच त्यांच्या वाहनांवरील अनधिकृत, कर्णकर्कश सायलेन्सर काढून टाकण्यात आले आणि त्या जागी कंपनीने दिलेले मूळ सायलेन्सर बसवण्यात आले. भविष्यात अशाप्रकारे आवाजाचे प्रदूषण करणार नाही, अशी समज देऊन त्यांना सोडून देण्यात आले. कारवाईदरम्यान काढण्यात आलेले सर्व सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले आहेत.
या कारवाईमुळे शहरातील कर्णकर्कश आवाजाला काही प्रमाणात आळा बसेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली असून, त्यांनी पोलिसांच्या या मोहिमेचे जोरदार स्वागत केले आहे. पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी या वेळी आवाहन केले आहे की, शहरातील कोणत्याही वाहनांवर कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर वापरू नयेत, तसेच फॅन्सी नंबर प्लेटचा वापरही टाळावा. यापुढेही अशा प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे संकेत त्यांनी दिले.