भूम, पुढारी वृत्तसेवा / तानाजी सुपेकर :
भूम नगरपरिषदेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही आघाडीला पूर्ण बहुमत मिळवता आले नाही. परिणामी नगरपरिषदेत सत्तासमत्वाची अनोखी स्थिती निर्माण झाली आहे. अध्यक्षपद आलमप्रभू शहर विकास आघाडीकडे गेले असून नगरसेवक संख्याबळ मात्र जनशक्ती नगर विकास आघाडीकडे राहिले आहे.
नगराध्यक्षपदासाठी झालेल्या थरारक लढतीत आलमप्रभू शहर विकास आघाडीच्या उमेदवार सौ. संयोगिता संजय गाढवे यांनी जनशक्ती नगर विकास आघाडीच्या उमेदवार सत्वशीला धनाजी थोरात यांचा १९८ मतांनी पराभव करत विजय मिळवला.
भूम नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासह एकूण तीन जागांसाठी १८ हजार ०७७ मतदारांपैकी १४ हजार ३१८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. रविवारी (दि. २१) सकाळी दहा वाजता आचार्य विद्यासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सात टेबलांवर तीन फेऱ्यांत मतमोजणी प्रक्रिया पार पडली.
पहिल्या फेरीपासूनच अध्यक्षपदाच्या लढतीत संयोगिता गाढवे यांनी आघाडी घेतली. पहिल्या फेरीत त्यांना २,०४३ मते मिळून त्यांनी १४९ मतांची आघाडी घेतली. या फेरीत सत्वशीला थोरात यांना १,८९४, अपक्ष प्रगती गाढवे यांना २४६, तर नोटाला ९८ मते पडली.
दुसऱ्या फेरीतही आलमप्रभू शहर विकास आघाडीची आघाडी कायम राहिली. तिसऱ्या फेरीत जनशक्ती नगर विकास आघाडीने काहीशी आघाडी घेतली असली, तरी ती विजयात रूपांतरित करण्यात त्यांना अपयश आले. अखेरीस संयोगिता गाढवे १९८ मतांनी विजयी घोषित झाल्या.
अंतिम निकालानुसार संयोगिता गाढवे यांना ७,०८६, सत्वशीला थोरात यांना ६,८८८, तर अपक्ष प्रगती गाढवे यांना २४६ मते मिळाली.
संयोगिता गाढवे यांचा विजय जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष करत आनंद साजरा केला. दरम्यान, नगरसेवकपदाच्या मतमोजणीत जनशक्ती नगर विकास आघाडीने १४, तर आलमप्रभू शहर विकास आघाडीने ६ जागांवर विजय मिळवला.
दरम्यान, उपविजेत्या सत्वशीला थोरात यांनी पुन्हा मतमोजणीचा अर्ज दाखल केला होता. मात्र कोणतीही विशेष बाब आढळून न आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा अर्ज फेटाळला.
मतमोजणी प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रेंगेर डोंगरे, तहसीलदार जयवंत पाटील, उपजिल्हा निवडणूक व नियंत्रण अधिकारी प्रवीण धरमकर, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शौला डाके, नायब तहसीलदार प्रवीण जाधव यांनी कामकाज पाहिले.
पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीगणेशा कानगुडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.