रत्नापूर :कळंब तालुक्यातील भोसा गावाची तब्बल ७० वर्षांपासूनची एसटी बससेवेची प्रतीक्षा अखेर संपली असून, धाराशिव-भोसा नियमित बससेवा सुरू झाली आहे. गावात प्रथमच एसटी बसचे आगमन होताच ग्रामस्थांनी चालक व वाहकांचे पुष्पहार घालून, पेढे भरवून आणि जल्लोषात स्वागत केले. यावेळी गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
भोसा गावातून धाराशिव जिल्हा मुख्यालयात शासकीय कामे, शिक्षण, आरोग्य सेवा, बाजारपेठ तसेच इतर दैनंदिन कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांची अनेक वर्षांपासून मोठी गैरसोय होत होती. खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत होता.
नव्याने सुरू झालेल्या एसटी बससेवेने या सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे.ही बससेवा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. पक्षाचे तालुकाध्यक्ष तुषार वाघमारे यांनी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्यांसह कळंब आगार प्रमुखांकडे निवेदन सादर करून धाराशिव-भोसा बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आगार प्रशासनाने बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
बससेवा सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी तुषार वाघमारे यांचे आभार मानत त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले. एसटीमुळे भोसा गावाचा धाराशिवशी थेट संपर्क प्रस्थापित झाल्याने विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाची मोठी सोय झाली असून, गावाच्या विकासालाही यामुळे गती मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.