भूम : विना नंबरप्लेट, नंबरप्लेटला काळी फ्रेम तसेच ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांना वठणीवर आणण्यासाठी भूम शहर पोलिसांनी सोमवारी विशेष अभियान राबविले. सकाळपासून शहरातील विविध चौक आणि मुख्य रस्त्यांवर तपासणी मोहीम राबवत पोलिसांनी ७८ वाहनधारकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून तब्बल ५४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
वाहन खरेदी करून तीन-चार महिने उलटल्यानंतरही वाहनावर नंबरप्लेट न लावणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले. तसेच नंबरप्लेटला काळी फ्रेम लावणे, ट्रिपल सीट प्रवास करणे आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवरही मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शहरातील मुख्य रस्ते तसेच विविध चौकांमध्ये तपासणी करत पोलिसांनी विना नंबरप्लेटची अनेक दुचाकी व चारचाकी वाहने ताब्यात घेतली. ही वाहने भूम शहर पोलिस ठाण्यात आणून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या या अभियानामुळे बेशिस्त वाहनचालकांमध्ये एकच खळबळ उडाली.भूम शहरात बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना पोलिसांनी विना नंबरप्लेट आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. या कारवाईमुळे नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांना चाप बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
भूम पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश खांडे, फौजदार बर्डे, हवालदार अजित कवडे, पोलिस अंमलदार योगेश यादव, राम बाराते, नानासाहेब कलाल, विश्वजीत टकले आणि रवि कोरे यांनी ही कारवाई केली.