Bail Pola festival pudhari photo
धाराशिव

Dharashiv Agriculture News : दुष्काळाच्या सावटाखाली बैलपोळा!

शेतात पिके करपली, बाजारात साज-सजावटीच्या साहित्याची महागाई

पुढारी वृत्तसेवा

समाधान डोके

ईट : वर्षभर शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाचा सण असलेला बैलपोळा उद्यावर येऊन ठेपला आहे. मात्र, यंदा बळीराजाच्या उत्साहावर दुष्काळाचे सावट आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके शेवटची घटका मोजत आहेत. शेतात पिके करपण्याची वेळ आली असताना आपल्या जीवाभावाच्या बैलांचा सण कसा साजरा करायचा, या विवंचनेत शेतकरी आहे.

पोळ्याच्या पार्श्वभूमीवर ईटच्या बाजारपेठेत बैलांच्या सजावटीचे साहित्य दाखल झाले आहे. झूल, गोंडे, घुंगरू, शिंगांचे रंग, दोर, वेसण आदी साहित्याने दुकाने सजली आहेत. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा सजावटीच्या साहित्याच्या दरात तब्बल १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महागाई आणि खरीप हंगामावरील संकटामुळे बाजारातील खरेदीचा उत्साह काहीसा मंदावलेला दिसत आहे.

आभाळाकडे डोळे, शेतात भेगा! गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीनसह खरीप पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पाण्याअभावी पिके सुकत असून, हाताशी आलेले उत्पादनही निसर्गाच्या लहरीपणामुळे वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे यंदाचा पोळा शेतकऱ्यांसाठी आनंदापेक्षा चिंतेचा ठरत आहे. तरीही वर्षभर साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा शेतकरी सोडायला तयार नाही.

पोळ्याच्या दिवशी बैलांना अंघोळ घालून, खांदे तुपाने व हळदीने शेकून त्यांची रंगरंगोटी केली जाते. झूल व विविध दागिन्यांनी त्यांना सजवून पूजा केली जाते. घरी गोडधोड करून बैलांना नैवेद्याचा घास भरविला जातो. काही ठिकाणी बैलजोडीची वाजतगाजत मिरवणूकही काढली जाते. दरम्यान, वाढत्या यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी होत असली तरी ग्रामीण संस्कृतीतील बैलपोळ्याचे महत्त्व कायम आहे.

सर्जा-राजाचा साजही महागला!

पोळ्यासाठी बैलांना सजविण्याच्या साहित्याच्या दरात यंदा १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. झूल, घुंगरू, गोंडे, शिंगांचे रंग, दोर आणि इतर साहित्य खरेदी करताना शेतकऱ्यांच्या खिशाला झळ बसत आहे. एकीकडे पिकांना पाणी नाही, दुसरीकडे महागाईने खर्च वाढला आहे. तरीही वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीनुसार सण साजरा करण्याची धडपड करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT