Arsoli Medium Project filled; Water problem solved
भूम, पुढारी वृत्तसेवा : दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर भूम तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे नदी-नाले, बंधारे दुथडी भरून वाहत असून, तलावांमधील पाणी पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. भूम आणि वाशी शहरांना पाणीपुरवठा करणारा वंजारवाडी (आरसोली) लघु प्रकल्प पूर्णपणे भरला आहे. या प्रकल्पातून भूम शहरासह वाशी शहराला पाणी पुरवठा होतो.
यंदाच्या दुष्काळामुळे आणि वाढत्या तापमानामुळे भूगर्भातील पाणी पातळी खूपच खाली गेली होती. त्यामुळे तालुक्यातील ९६ पैकी ६९ गावांमध्ये, म्हणजेच जवळपास १ लाख ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. अनेक गावांना अधिग्रहणाद्वारे टँकरने पाणी पुरवले जात होते. मे महिन्यात पावसाची चांगली सुरुवात झाली असली तरी, ऐन मृग नक्षत्रापासून पावसाने पाठ फिरवली होती.
मात्र, आता दीड महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने जोरदार आगमन केल्याने ही पाणीटंचाईची समस्या मिटण्यास मदत झाली आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग आणि तूर या पिकांना जीवदान मिळाले आहे. पिके चांगलीच बहरली असून, शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. नदी-नाले, बंधारे भरल्याने विहिरी आणि विंधन विहिरींमधील पाणी पातळीत वाढ झाली आहे, ज्यामुळे चारा आणि पाण्याच्या प्रश्नावर तोडगा निघाला आहे. बाजरी आणि मका पिकेही जोमात आहेत.
सध्या नांदगाव तलावाचा सांडवा पडण्यासाठी थोडेच अंतर बाकी आहे. आरसोली आणि बाणगंगा येथील तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढत आहे. तसेच वालवड, पाश्रुड, ईट, मानकेश्वर मंडळातील लहान-मोठे तलावही भरू लागले आहेत. धाराशिव पाटबंधारे उपविभाग क्र. ३ अंतर्गत असलेल्या बाणगंगा, संगमेश्वर, रामगंगा या तीन मध्यम प्रकल्पांमध्ये, तीन साठवण तलावांमध्ये, नऊ पाझर तलावांमध्ये आणि चार कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये पाण्याची पातळी वाढत आहे. भूम, ईट, वालवड, मानकेश्वर, आंबी या पाच मंडळांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाऊस झाल्याने सध्या सात तलावांमध्ये पाणीसाठा हळूहळू वाढत आहे.
भूम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आरसोली लघु प्रकल्पात सध्या १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. गोरमाळा साठवण तलावानेही गुळणी मारली आहे. लवकरच तालुक्यातील सर्व तलाव भरतील अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.