पुढारी वृत्तसेवा :
तुळजापूर येथील प्रणव नरसिंग जाधव हा अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आला आहे. या यशाबद्दल राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद काळे यांनी त्याचा सत्कार केला.
अतिशय हुशार, जिद्दी आणि कष्टाळू असा प्रणव नरसिंग जाधव यांनी महाराष्ट्र शासन (MPSC) अंतर्गत घेतलेल्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांची नगर रचना व मूल्यांकन संचालनालय या विभागात असिस्टंट टाऊन प्लॅनिंग ऑफिसर वर्ग एक या पदासाठी निवड झाली असून, त्यांनी महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा तुळ हे त्याचे मूळ गाव असून तुळजापूर येथील एसटी कॉलनी परिसरात त्यांचे निवासस्थान आहे. लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल तुळजापूर येथे पहिली ते चौथी, तुळजाभवानी विद्यालय तुळजापूर येथे पाचवी ते सातवी, मविराज शिंदे प्रशाला तुळजापूर येथे सातवी ते दहावी आणि दयानंद महाविद्यालय लातूर येथे अकरावी व बारावी विज्ञान शाखेचे त्याने शिक्षण घेतले आहे. त्यानंतर एमआयटी पुणे येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. 2018 वर्षापासून त्याने एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली होती.
नाशिक येथील मनोज वाणी आणि पुणे येथील क्लासेस मध्ये त्यांनी एमपीएससीच्या अभ्यासाचे धडे गिरवले. नगररचना विभागात दुसऱ्याच प्रयत्नामध्ये त्यांनी महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. प्रणव जाधव यांच्या या यशामागे त्याचे वडील प्राध्यापक एन बी. जाधव, व मातोश्री यांचे मार्गदर्शन आहे. या यशाबद्दल राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद काळे, वडील प्रा . नरसिंग जाधव, डॉ. पांडुरंग शिवशरण, सौ. काळे, डॉ सतीश महामुनी, भोसले गुरुजी यांनी त्यांचा शाल फेटा देऊन या निमित्ताने सत्कार केला. हे यश मिळवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत, चिकाटी, सातत्य आणि स्वप्नांवर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे कष्ट केले आहे.
भविष्यामध्ये आपण नगररचना विभागामध्ये वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या याच्या अनुषंगाने काही संशोधनात्मक काम करण्याचे निश्चित केलेले आहे, नव्याने एमपीएससी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण असे सांगू इच्छितो की, प्लॅन ए म्हणून आपण एमपीएससी परीक्षेकडे पाहावे आणि प्लॅन बी म्हणून पदवीधर पदवी आणि नोकरी याचा विचार करावा अशी सूचना त्यांनी केली आहे.
वडिलांची प्रतिक्रिया प्रणव ने आपले अभियांत्रिकी शिक्षण सुरू असताना एमपीएससी करण्याचा निर्धार केला होता. त्याप्रमाणे त्यांनी अत्यंत जिद्द चिकाटी आणि प्रामाणिकपणे अभ्यास केला त्याला मिळालेले हे यश आम्हा सर्व जाधव परिवारासाठी आणि तुळजापूर तालुक्यासाठी भूषणाह आहे.प्रा. नरसिंग जाधव, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग