Amrut 2, stop the cement road construction work
भूम, पुढारी वृत्तसेवा : शहरात नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या अमृत योजना- २ मधील पाईपलाईन व नगर-ोत्थान अंतर्गत सिमेंट रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची सुरू असल्याचा गंभीर आरोप करत जनशक्ती नगर विकास आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या सर्व कामांची तत्काळ दखल घेऊन कामे बंद करावीत, तसेच संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अमृत योजना-०२ अंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईन कामांमध्ये शासनाने निश्चित केलेल्या अंदाजपत्रक व तांत्रिक निकषांचे उल्लंघन होत आहे. नागरिकांचा तीव्र विरोध असतानाही ही कामे बिनधास्त सुरू ठेवण्यात येत आहेत.
विशेष म्हणजे, अमृत योजनेतील कामे अपूर्ण असताना नगरोत्थान अंतर्गत सिमेंट रस्त्यांची कामे सुरू करणे हे गंभीर व संशयास्पद असल्याचे आघाडीने स्पष्ट केले आहे. कामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत रस्ते खोदून योग्य पद्धतीने भराव न करता केवळ डांबर टाकून तात्पुरते रस्ते तयार केले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या प्रकरणी मुख्याधिकारी यांनी तात्काळ सर्व कामे थांबवून चौकशी करावी, दोषी कंत्राटदारांवर कारवाई करावी व दर्जेदार, पारदर्शक कामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी जनशक्ती नगर विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी केली आहे. निवेदनावर सह्या असलेले नूतन नगर-सेवक आबासाहेब मस्कर, चंद्रमणी गायकवाड, अनिल शेंडगे, रुपेश शेंडगे, रामराजे कुंभार, नवनाथ रोकडे, विठ्ठल बागडे, सुनीता वीर, लक्ष्मी साठे, नुरजहाँ महंमद इसाक माणियार, सुरेखा काळे, शमशाद हारून मुजावर, शीतल गाडे, चंद्रकला पवार यांच्या निवेदनावर पदाधिकारी व नागरिकांच्या देखील सह्या आहेत.