

The Shakambhari Navratri festival of Goddess Tulja Bhavani begins today.
तुळजापूर : संजय कुलकर्णी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्तिदेवता श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास रविवारी (दि. २८) पौष शुक्ल पक्ष दुर्गाष्टमी दिनी घटस्थापनेने प्रारंभ होत आहे.
गत आठ दिवसांपूर्वी सुरू झालेली मातेची मंचकी निद्रा पहाटे संपुष्टात येऊन देवीची मुख्य मूर्ती सिंहासनाधिष्ठित करण्यात येऊन मातेला पंचामृत अभिषेक सुरू केले जाणार आहेत. देवीची त्रिकाल पूजा पार पडणार आहे. पहाटे स्थापित मूर्तीला चरणतीर्थ आटोपून अभिषेक पार पडल्यानंतर देवीच्या नित्य पूजेची घाट सकाळी होऊन पुन्हा नियमित पंचामृत अभिषेक सुरू होणार आहेत.
सायंकाळीही नित्य पूजेची घाट होऊन अभिषेक घालण्यात येतात. रविवारी सकाळी देवीची नित्योपचार पूजा, वस्त्रालंकार, नैवेद्य, धुपारती, अंगारा पार पडल्यानंतर मंदिरातील गणेश विहार ओवरीत शाकंभरी देवीच्या प्रतिमेची विधिवत स्थापना होऊन या उत्सवाच्या यजमानांकडून त्याठिकाणी घटस्थापना करण्यात येऊन स्थानिक ब्रह्मवृंदांना अनुष्ठानासाठी वर्णी दिली जाणार आहे. यंदा नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तब्बल एक आठवडाभर शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने तुळजापुरात 'आई राजा उदो उदो', 'सदानंदीचा उदो उदो'चा जयघोष आसमंतात घुमणार आहे.
तुळजाभवानी माता एकमेव चलदेवता
तुळजापूर येथील देवीचा महिमा न्यारा आहे. चलदेवता म्हणून सर्वदूर ख्याती प्राप्त असलेल्या श्री तुळजाभवानी मातेची वर्षातून तीनवेळा निद्रा सुरू होते. शारदीय नवरात्र महोत्सवादरम्यान दोनवेळा आणि पौष शुक्ल महिन्याच्या पूर्वसंध्येला असे वर्षातील २१ दिवस देवीची मुख्य मूर्ती सिंहासनावरून हलवून पलंगावर निद्रिस्त केली जाते.
ऐन शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या तोंडावर मंदिर संस्थानने मंदिरात जाण्या-येण्याचे मार्ग बदलले. मातेचे मुख्य महाद्वार केवळ बाहेर पडण्यासाठी उघडे ठेवले. स्वस्त पेड दर्शन बंद करून महागडे पेडदर्शन सुरू ठेवले, अशा अनेक बदलात सामान्य भाविकांची कुचंबणा होत आहे.