Aim to make Dharashiv a modern, digitally advanced district Pratap Sarnaik
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्याला आधुनिक, डिजिटल आणि प्रगत जिल्हा बनवण्याचे उद्दिष्ट मांडले. या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देत, जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचे स्वप्न आपण सर्व मिळून साकार करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. तत्पूर्वी त्यांनी स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली. आपल्या भाषणात सरनाईक यांनी १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा भारतीय संघराज्यात कसा विलीन झाला, याचा गौरवशाली इतिहास सांगितला. महिला आणि विद्यार्थ्यांचा सहभागः निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्धच्या या लढ्यात सर्व समाजघटकांनी, विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला, असे त्यांनी सांगितले.
धाराशिवमधील कॅम्पः जुलै १९४७ ते मार्च १९४८ या कालावधीत गौडगांव, बार्शी, चिंचोली, वाघोली, आंबेजवळगे, कौडगांव, वाघदरी, पानगांव, मुस्ती आणि इट या ठिकाणी स्वातंत्र्यसैनिकांचे 'कॅम्प' सक्रिय होते. युनेस्कोच्या वारसा यादीत किल्लेः छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. डिजिटल प्रशासनः प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी 'तुळजाई चॅटबॉट', 'कल्पवृक्ष स्मार्ट-जीआर' आणि 'कार्यसिद्धी पोर्टल' यांसारखी डिजिटल साधने सुरू करण्यात आली आहेत. सेवा पंधरवडाः महसूल विभागामार्फत 'छत्रपती शिवाजी महाराज, महा राजस्व अभियान' अंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत 'सेवा पंधरवडा' साजरा होत आहे.
यामध्ये पाणंद रस्ते मोहीम आणि शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची कार्यवाही केली जाईल. या कार्यक्रमाला खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर, स्वातंत्र्यसैनिक आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या वेळी मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी आत्महत्या केलेल्या व्यक्तींच्या वारसदारांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रत्येकी दहा लाख रुपयांचे धनादेश, तर नैसर्गिक आपत्ती सहाय्यता निधीमधून फुलुबाई इंगळे यांना चार लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच, कुणबी जात प्रमाणपत्रांचेही वाटप करण्यात आले.
पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्ह्याच्या प्रगतीसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. 'विकसित भारत-२०४७' आणि 'विकसित महाराष्ट्र- २०४७' च्या व्हिजननुसार जिल्हा विकासाचा आराखडा तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.