A young man died after falling from a tractor
वाशी, पुढारी वृत्तसेवा झिन्नर रस्त्यावर उंदरे वस्ती जवळ गुरुवारी (दि. १८) रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या अपघातात ट्रॅक्टरवरून खाली पडल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सुरज हरिश्चंद्र तावरे (वय २२, रा. झिन्नर, जि. धाराशिव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
सुरज तावरे हा नरसिंह साखर कारखान्यावर कामाला होता. गुरुवारी तो काही कामानिमित्त कारखान्यावर गेला नव्हता. समाधान तावरे (वय ३५, रा. झिन्नर) यांच्या मालकीचे ट्रॅक्टर घेऊन तो वाशी येथे गेला होता. रात्री ट्रॅक्टरमध्ये पाण्याच्या दोन टाक्या व पीव्हीसी पाईप घेऊन झिन्नरकडे येत असताना हा अपघात झाला.
उंदरे वस्ती जवळ ट्रॅक्टर चालवत असताना सुरजचा तोल गेल्याने तो ट्रॅक्टरवरून रस्त्यावर पडला. डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडले होते. दरम्यान, चालकाविना चालू असलेला ट्रॅक्टर रस्त्याच्या उजव्या बाजूच्या खड्यात जाऊन थांबला.
घटनेची माहिती मिळताच वाशी पोलीस ठाण्याचे जमादार कपिल बोरकर यांनी घटनास्थळी धाव घेत मयताला वाशी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर सुरज तावरे यास मृत घोषित केले.
शुक्रवारी सकाळी डॉ. सुळ यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. अंत्यसंस्कार झिन्नर येथे करण्यात आले. वाशीझिन्नर रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट असून वारंवार छोटे-मोठे अपघात होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.