धाराशिव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मंगळवारी (दि. 20) धाराशिव तालुक्यात एकूण 115 उमेदवारी अर्ज दाखल झाले. बुधवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने आज मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
धाराशिव तालुक्यात 11 जिल्हा परिषद गट व 22 पंचायत समिती गण आहेत. सर्वच गटांतून इच्छुक उमेदवारांनी मोठी तयारी केली असून राजकीय वातावरण तापू लागले आहे. दरम्यान, महायुती व महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र निवडणूक लढवणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने अनेक उमेदवार संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत व बुधवारी सकाळी विविध राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आजच्या अर्ज दाखल प्रक्रियेनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
तेर गटात हाय व्होल्टेज लढत निश्चित
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी करून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी मंगळवारी केशेगाव व तेर जिल्हा परिषद गटातून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) गटाच्या सक्षणा सलगर यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केल्याने तेर गटात हाय व्होल्टेज लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित असल्याने सौ. पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.