देगलूर ; पुढारी वृत्तसेवा नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे रेती बाबत शासनाचे धोरण जाहीर झाले असले, तरी अद्याप त्याची अंमलबजावणी होत नसल्याने रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेजारील कर्नाटक राज्यात व सोलापूर, लातूर या भागात तालुक्यातल्या शेळगाव, शेवाळा, मेदनकल्लूर, सांगवी उमर व बिलोली तालुक्यातील सगराळी, येसगी येथील रेतीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे या भागातील लाल रेतीची तस्करी सुरूच आहे.
दिवस-रात्र रेती तस्करांकडून रेतीची तस्करी सुरूच ठेवल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. येसगी ता. बिलोली येथील रेती घाटातून १४ चाकी नऊ वाहने अवैध उत्खनन करून शहापूर मार्गे कर्नाटककडे जात होती. रविवार दि. १६ रोजी दुपारी दोन वाजता तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही नऊ वाहने पकडली.
यातील आठ वाहने तहसील कार्यालयात तर एक वाहन खानापूर फाट्यावर ठेवण्यात आले असून, या रेतीचे मोजमाप करून नियमानुसार दंड आकारून संबंधितावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे महसूल विभागातून सांगण्यात आले. या कारवाईत तहसीलदार बी. जे. मिठेवाड, ग्रामसेवक पुष्पलवार तलाठी राजेश गतलेवाड यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
हेही वाचा :