मुलांना सुट्टीमध्ये शिकवा पाककौशल्य, जाणून घ्‍या फायदे | पुढारी

मुलांना सुट्टीमध्ये शिकवा पाककौशल्य, जाणून घ्‍या फायदे

बऱ्याच पालकांना वाटते की, आपल्या मुलांना स्वयंपाकघरात मदत करावी, पण त्यासाठी मुलांना कौशल्याने स्वयंपाकघरातील वस्तू कशाप्रकारे हाताळायच्या आणि त्याचा वापर कसा करायचा हे शिकविले पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीने आपण मुलांची मदत घेऊन यांना स्वयंपाकघरातील वस्तूंचा वापर शिकवू शकतो. साध्या सोप्या पद्धतीने मुलांच्या मदतीची सुरुवात होऊ शकते. जाणून घेवूया मुलांना पाककौशल्‍याचे धडे कसे द्यावेत आणि त्‍याचे होणारे फायदे याविषयी…

मुलांना असे द्या पाककौशल्याचे धडे?

● मुलांना ब्रेडवर किंवा टोस्टवर बटर लावायला सांगावे.

• केळे कापण्यासाठी मुलांना प्लास्टिकची सुरी द्यावी, तसेच सॅलेड कापण्यासाठीसुद्धा अशाच पद्धतीने प्लास्टिक सुरीचा वापर करण्यास द्यावा.

• चीझचा वापर करताना छोटया धार नसलेल्या खिसणीचा वापरण्यास शिकवावे, तसेच दुधाचा कप भरल्यानंतर साखर विरघळण्यासाठी त्यांना हालवण्यास सांगावे.

• कुकीज केक यासारखे पदार्थ बनविताना त्यांना वेगवेगळे पदार्थ मिक्सरमध्ये टाकण्यास सांगावे.

• ब्रेड टोस्टरमध्ये टाकणे आणि बाहेर काढणे, बटाटा, गाजर, सफरचंद यांची साल काढणे, स्लाईसरच्या मदतीने सफरचंदाच्या फोडी करणे अशा गोष्टी शिकवता येतात. तसेच मायक्रोव्हेवचा वापर कसा करायचा, त्यावेळी कोणता मोड वापरायचा हेही सांगता येईल.

• न सांडता अंडे फोडणे हेसुद्धा एक महत्त्वाचे कौशल्य आहे. अर्थात हे करताना पालकांनी मुलांसोबत राहावे. सुरुवातीला हे जमले नाही तरीसुध्दा हळूहळू याबाबतचे मुलांचे कौशल्य वाढत जाते. मुलांना स्वयंपाक शिकवल्यामुळे स्वयंपाकासाठी त्यांची मदत घेतल्यामुळे खालील फायदे होतात.

पाककौशल्य शिकल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास होते मदत

• स्वयंपाक शिकल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. आपण कुठल्याही बाबतीत यशस्वी होऊ शकतो, असा विश्वास निर्माण होतो. बेसबॉल डान्ससारख्या गोष्टी शिकताना ज्याप्रमाणे फायदा होतो तसाच फायदा पाककौशल्य शिकल्यामुळेसुद्धा होतो. जसजसे कौशल्य वाढत जाते तसतसा त्यांचा आत्मविश्वास वाढतो. काही मूलभूत कौशल्ये शिकल्यानंतर मुले वेगवेगळ्या कल्पनांचा वापर करणे सुरू करतात. त्यामुळे त्यांची कल्पनाशक्तीदेखील वाढते. म्हणूनच अशा काही मूलभूत गोष्टी आपण त्यांना सांगू शकतो.

पौष्टिक अन्न खाण्यासाठी मुलांना प्रोत्साहन मिळते

• पौष्टिक अन्न खाण्यासाठी मुलांना प्रोत्साहन मिळते. यामुळे आपण कुटुंबाच्या कामामध्ये काही तरी हातभार लावतो, अशी भावना मुलांच्या मनात निर्माण होते. स्वतः मदत केली असेल तर तो पदार्थ कुटुंबासोबत खाताना मुलांना मजा येते आणि मुले स्वतःहून जेवायला बसतात.

मुलांचा बाहेरच्या खाण्याचा आग्रह कमी होतो

त्याचबरोबर मुलांसोबत उत्तम वेळ पालकांना यामुळे घालवता येतो. मुले जर घरीच पदार्थ बनवू लागले तर जंकफूडचा बाहेरच्या खाण्याचा आग्रह कमी होतो. सर्वात महत्वाचे म्हणजे, आजच्या काळात नोकरी- शिक्षणासाठी मुला-मुलींना बाहेरगावी राहावे लागते. अशा वेळी बालवयात शिकलेल्या या गोष्टी निश्चितच उपयोगी ठरतात. चला तर मग या सुट्टीमध्ये मुलांना पाककौशल्याचे धडे देऊ या आणि सुटीचा सदुपयोग करूया.

( संगोपन ) मोना भावसार

Back to top button