छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आज (दि.२७) जालना रोडवरील पंचतारांकित हॉटेल जी- २० परिषदेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रम संपल्यावर तिथे चहा- नाश्त्याची सोय करण्यात आली होती. मात्र, तिथे नाश्ता करण्याऐवजी या सर्वांनी समोर रस्त्यालगत असलेल्या छोट्या हॉटेलात जात मिसळ आणि मुगवड्यावर ताव मारला. काही वेळात काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड हे देखील त्यांच्यात सहभागी झाले.
जी-२० देशांची वुमेन परिषद २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचा एक कार्यक्रम हॉटेल रामा मध्ये पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे आदींची उपस्थिती होती. सकाळी ११ वाजेच्या सुमारास कार्यक्रम संपला. या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या चहा- नाश्त्याची सोय करण्यात आली होती. मात्र, केंद्रीय मंत्री दानवे आणि पालकमंत्री भुमरे यांनी तिथे नाश्ता करण्याऐवजी रस्त्यालगत सिडको एन ३ भागात असलेल्या छोट्या हॉटेलात गेले. तिथे जाऊन त्यांनी मिसळ आणि मूगवडा खाल्ला. त्यांच्या पाठोपाठ भागवत कराड हे देखील तिथे आले. त्यानंतर काही वेळात काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड देखील तिथे पोहचले. मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील आणि इतर काही कार्यकर्तेही हजर होते. या सर्वांनी बराच वेळ चहा नाश्ता करत चर्चा केली.
हेही वाचा :