सोयगाव, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील निसर्गरम्य अजिंठा डोंगर रांगेच्या कुशीत सोयगावपासून दक्षिणेला ४ किलोमीटर अंतरावर रुद्रेश्वर गणेश लेणी आहेत. तर या लेण्याजवळच वेताळवाडी किल्ला आहे. ही दोन ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करत असतात. श्रावण महिन्यात येथे खान्देश, मराठवाडासह पश्चिम महाराष्ट्रातील हजारो भाविक व पर्यटक भेट देत असतात.
हा परिसर निसर्ग संपन्न व हिरवळलेल्या सौंदर्याने नटलेला असतो. नेहमी येथे वन्य प्राण्यांचे दर्शन होत असते. निसर्गाची मुक्त उधळण पर्यटकांना भुरळ घालत असते. येथे जाण्यासाठी सोयगाव-गलवाडा-वेताळवाडी तसेच सिल्लोड- उंडणगाव- हळदा- रस्त्याने वेताळवाडी गावावून जावे लागते. काही अंतर कापल्यावर डोंगर वाटा चढून, खोल खोल दरीत उतरून मंदिरात प्रवेश होतो. मंदिराचा गाभारा आणि सभामंडप ६० फूट लांब आणि १२ फूट उंच आहे.
हे मंदिर एका शिळेवर कोरले असून प्राचीन शिवलिंग आहे. हे शिवलिंग घुशमेंश्वराचे उपलिंग म्हणून ओळखले जाते. डाव्या बाजूला डाव्या सोंडेचा गणपती आहे. जवळ रिद्धी, सिद्धी, नटराज आणि भगवान नृसिहांची मूर्ती आहे. पिंडीसमोरील नंदीचे कोरीव काम कलाकारांची कलेची साक्ष देतात. समोर मोठा तीर्थकुंड असून मोठा धबधबा सुद्धा आहे.
रुद्रेश्वर गणेश लेणीच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यात या मंदिरात मोठी गर्दी असते. खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, जालना, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील भाविक, पर्यटक या ठिकाणी श्री गणेशच्या दर्शनासाठी येतात. या लेणीत पुरेशा प्रकाश नसल्याने काही कोरीव काम पाहता येत नाही. जवळच, वेताळवाडी किल्ला असून सोयगावच्या मध्यम प्रकल्पाचा मोठा जलाशय पाहायला मिळतो. या लेणीला २००६-२००७ या वर्षामध्ये तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.
हेही वाचा