मराठवाडा

परभणी : गंगाखेड येथे महाविद्यालयीन युवकाचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू

दिनेश चोरगे

गंगाखेड (जि. परभणी) ; पुढारी वृत्तसेवा : शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या रामकिशन संजय नरवाडे (रा.ओमनगर, गंगाखेड) या १७ वर्षीय युवकाचा गोदावरी नदीपात्रातील गाळात फसल्याने बुडून मृत्यू झाला. बुधवारी (दि.२६) दुपारी २ वाजता मित्रांसोबत पोहोयला गेला असताना ही दुर्देैवी घटना घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, रामकिशन नरवाडे हा युवक मित्रांसमवेत गोदावरी नदीत पोहायला गेला होता. शहरातील गंगाखेड- धारखेड पुलाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी गाळाचे प्रमाण अधिक आहे. या ठिकाणी पोहत असताना रामकिशन गाळात फसत गेला. तो बुडत असल्याचे दिसताच नदीपात्राजवळ उभे असलेल्या झारेकरी यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पूल बांधकामाच्या कामामुळे तेथे गाळाचे प्रमाण अधिक असल्याने रामकिशन याचा जागीच मृत्यू झाला.

पूल कामाच्या ठिकाणी पोहणे जिवावर बेतले

रामकिशन हा केरवाडी गावातील युवकांसह गंगाखेड येथील महाविद्यालयात आला होता. दुपारच्या सुट्टीनंतर रामकिशन व त्याचे मित्र गोदावरी नदी पात्रात पोहण्यासाठी गेले परंतु तेथे गंगाखेड-धारखेड पुलाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने संबंधित पाण्याचा परिसर हा गाळयुक्त झाला आहे. नेमके यास ठिकाणी पोहणे रामकिशन याच्या जीवावर बेतले.

आजीकडे होता सांभाळ

रामकिशन याच्या आई-वडिलांचेही निधन झालेले आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर त्याची आजी रामकिसनसह त्याचे दोन भाऊ व बहीण यांचा सांभाळ करीत असे. मात्र वृद्ध आजीला परिस्थितीमुळे रामकिशन याचा सांभाळ होत नसल्याने त्याला स्वप्नभूमी स्वयंसेवी संस्था केरवाडी येथे सांभाळासाठी ठेवण्यात आले होते. रामकिशन यांच्या पश्चात वृद्ध आजी, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे.

 हेही वाचा :

SCROLL FOR NEXT