ZP Election: Fifteen hundred officers and employees have been appointed
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण शुक्रवारी (दि. ३०) झाले. या प्रशिक्षणामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एकूण १५०० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सिल्लोड येथे जळगाव रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे शुक्रवारी सकाळी प्रशिक्षण पार पडले. हे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांपैकी हजर १ हजार ४०६ मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षकांनी ईव्हीएम हाताळणी, मतदान प्रक्रिया, मतमोजणीपूर्व तयारी याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. यावेळी PPT द्वारे सादरीकरण करण्यात आले असून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंका व समस्यांचे निराकरणही करण्यात आले.
प्रशिक्षणास अनुपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारणे दाखवा नोटीस बजावून फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी दिला.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय देवराये (तहसीलदार, सिल्लोड), रत्नाकर पगार (गटविकास अधिकारी, पंचायत समिती सिल्लोड), कारभारी दिवेकर (मुख्याधिकारी, नगरपरिषद सिल्ल-रोड), रमेश ठाकूर (गटशिक्षणाधिकारी), जुबेर सिद्दीकी (मिडिया कक्ष प्रमुख), देवेंद्र सूर्यवंशी (प्रकल्प अधिकारी) व जितेंद्र पानपाटील आदी अधिकारी उपस्थित होते.