Zilla Parishad students created a robot.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील ४१ जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी रोबेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेऊन नावीण्यपूर्ण प्रयोग साकारले. यंत्रमानव, स्मार्ट डस्टबीन, स्मार्ट कॅप, फायर फायटर रोबो, सेंसर मोटार यंत्र आदी प्रयोगांनी लक्ष वेधले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बजाज इन्क्युबूशन सेंटर व जिप शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन शुक्रवारी (दि.१९) करण्यात आले. जिल्ह्यातील ४१ शाळांमधील ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्टार्ट अप, संशोधन व नवोन्मेष याविषयी जागृती व्हावी म्हणून या उद्देशान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिपचे अतिरिक्त सीईओ वासुदेव साळुंके, अटल इन्क्युबूशन सेंटरचे डॉ. प्रवीण वक्ते, सीईओ अमित रंजन, रोबोटिक्सचे दीपक कोलते आदींची उपस्थिती होती.
ग्रामीण विद्यार्थ्यांना एक्सपोजर हवे : कुलगुरु
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता व कष्ट करण्याची तयारी असते. त्यांना एक्सपोजर मिळणे गरजेचे आहे, असे कुलगुरु डॉ. विजय फुलारी म्हणाले. ४१ प्रयोगातील उत्कृष्ट १० प्रकल्पांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी अटल इन्क्युबूशन सेंटरच्या वतीने सहाकर्य करण्यात येईल, असेही त्यांनी घोषित केले.
नवसंशोधनासाठी यज्ञ उपक्रम
या उपक्रमाचा उद्देश शहरी आणि ग्रामीण भागातील दरी कमी करणे हा असून, जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक जिप शाळा आणि अटल टिंकरिंग लॅब्समधील तरुण बुद्धिमत्तेचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. इयत्ता ५ वी ते ८ वीमधील विद्यार्थी या स्पर्धेत संघ म्हणून सहभागी झाले होते.