Zilla Parishad and Panchayat Samiti Elections: More than six thousand applications filed in Marathwada
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व तालुक्यांच्या ठिकाणी इच्छुकांची एकच गर्दी उसळली होती. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, परभणी आणि लातूर या चार जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यासाठी सहा हजारांपेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.
अर्ज भरण्याची मुदत दुपारी ३ वाजता संपली, परंतु त्यावेळी निवडणूक कार्यालयात हजर असलेल्या सर्व इच्छुकांचे अर्ज स्वीकारणे बंधनकारक असल्याने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, परभणी व लातूर या चार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी निवडणुका होत आहे. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे गुऱ्हाळ तीन दिवसांपासून सुरू होते. अखेर अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या एक दिवस आधी म्हणजे मंगळवारी सायंकाळी संभाजीनगरात युती आणि आघाडीवर शिक्कामोर्तब झाले.
त्यामुळे कालपर्यंत मोजक्याच उमेदवारांचे अर्ज दाखल होऊ शकले होते. आज चित्र स्पष्ट झाल्यानंतर अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी उसळली. जिल्ह्यात नऊ तालुक्यांच्या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची सोय करण्यात आली होती. सर्व नऊ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सकाळी १० वाजेपासून उमेदवारांनी अक्षरशः रांगा लावल्या होत्या. अर्ज स्वीकारण्याची मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत होती. परंतु ही मुदत संपायच्या वेळी निवडणूक कार्यालयाच्या आत जेवढे उमेदवार उपस्थित होते त्या सर्वांचे अर्ज स्वीकारण्यात आले. त्यामुळे ही प्रक्रिया काही ठिकाणी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होती.
अर्जाची आज छाननी
प्राप्त उमेदवारी अर्जाची छाननी गुरुवार, दि. २२ जानेवारी रोजी होणार आहे. त्यानंतर लगेचच वैध नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. अर्ज मागे घेण्यासाठी २७जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. २७जानेवारी रोजीच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. तर जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी येत्या ५ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून ७फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
संभाजीनगरात सर्वाधिक अर्ज
मराठवाड्यात संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या १२६ गणांसाठी २२०० च्या वर उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात सर्वाधिक ५२९ अर्ज संभाजीनगर तालुक्यात दाखल झाले आहेत.