Sambhajinagar Crime News : वाद मिटविण्याच्या बहाण्याने तरुणाची हत्या file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : वाद मिटविण्याच्या बहाण्याने तरुणाची हत्या

रोजाबागमध्ये भररस्त्यात थरार; सिटी चौक पोलिसांकडून ७ आरोपींना बेड्या, एक फरार

पुढारी वृत्तसेवा

Youth murdered under the pretext of resolving a dispute

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चार दिवसांपूर्वी झालेल्या वादाचे पर्यावसान अखेर एका २१ वर्षीय तरुणाच्या निघृण हत्येत झाले. 'भांडण मिटवायचे आहे, भेटायला ये', असा निरोप देऊन रोजाबाग परिसरात बोलावून घेत टोळक्याने तरुणावर चाकू, रॉड आणि दांड्यांनी हल्ला करून रविवारी (दि.२६) मध्यरात्री पावणेएक वाजेच्या सुमारास रोजाबाग ते बी. क्रेमी कॅफेदरम्यानच्या रस्त्यावर घडला. नासेर खान तारेख अहेमद (२१, रा. शहाबाजार) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून, एक आरोपी फरार आहे. दरम्यान, न्यायालयात पुन्हा नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. आरोपींना अटकेची नोटीस वेळेत न दिल्याच्या मुद्द्यावरून न्यायालयाने आरोपीना सोडले, मात्र पोलिसांनी बाहेर येताच त्यांना पुन्हा ताब्यात घेतले.

शाहीद नुरुद्दीन चारनिया (२३, रा. हिमायतबाग), शेख कदीर शेख रहिम ऊर्फ अमिज ऊर्फ माया (२३, रा. महेमुदपुरा), उबैदुर रहेमान पटेल (२३, रा. रोजेबाग), अविनाश अमोल भोसले ऊर्फ क्रिश बाबा (१८, रा. एन-१३ हडको), शेख राफे रईसुद्दीन (२०, रा. जयसिंगपुरा), अक्षय विजय शिरसाठ (२१, रा. हरिओमनगर, हसूल) व एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला अटक करण्यात आली आहे, तर शहेबाज (रा. सिद्धार्थनगर) हा फरार आहे.

फिर्यादी मृताचा भाऊ आमेर खान (२६) यांच्या तक्रारीनुसार, ते २२ जुलै रोजी सायंकाळी रोशनगेटच्या एका हॉटेलबाहेर उमे असताना त्यांच्या शेजारी उभी असलेली दुचाकी बाजूला करताना यासीनने शिवीगाळ केली. त्यावेळी आमेर यांनी यासीनला मारहाण केली होती. याचाच राग मनात धरून यासीनने त्याचा मित्र अशरफ खानला सोबत घेऊन त्याच रात्री आमेरला गाठून वाद घातला होता.

२३ जुलै रोजी आमेर वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री ११ वाजेच्या सुमारास पंचायत समितीजवळ गेले असता तिथे यासीन आणि अशरफ यांनी पुन्हा कुरापत काढत मारहाण केली. यावेळी आमेरचा लहान भाऊ नासेर (मृत) याने अशरफला जाब विचारला. या घटनेनंतर अशरफचे वडील आणि कटकटगेटचे माजी नगरसेवक अज्जू पहिलवान यांनी मध्यस्थी करत तुम्ही दोघे मित्र आहात, वाद मिटवून टाका आणि पोलिसांत जाऊ नका, अशी समजूत काढल्याने आमेर यांनी तक्रार दिली नव्हती.

जामिनावर सुटताच केली हत्या

आरोपी शेख कदीर ऊर्फ माया याला शनिवारीच आझाद कॉलेज परिसरात शस्त्राचा धाक दाखवून दहशत माजवीत असताना अटक केली होती. लगेच जामिनावर सुटला आणि टोळीच्या मदतीने रात्री नासेरची हत्या केल्याचे समोर आले आहे. माया हा बटन गोळी, अंमली पदार्थ विक्रीचा धंदा करतो, असा मृताच्या भावाचा आरोप आहे. गेल्या दोन दिवसांपासून नासेरला जिवे मारण्याचा आरोपींचा प्लॅन सुरू होता, असेही मृताचा भाऊ आमेर याने सांगितले.

रात्रीतून सात आरोपी गजाआड

पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त पंकज अतुलकर आणि सहायक आयुक्त सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनात सिटी चौक ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी, गुन्हे शाखेचे गजानन कल्याणकर, रवींद्र सांगळे यांनी पथकांसह घटनास्थळी धाव घेतली. सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक भागवत मुठाळ, संजय राठोड, प्रमोद कोळेकर यांच्या पथकाने ७ आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

न्यायालयात काय घडले?

सिटी चौक पोलिसांनी अटकेतील सहा आरोर्पीना न्यायालयात हजर केले होते. सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी कायदेशीर बाबींवर बोट ठेवत, आरोपींना कायदेशीर प्रक्रियेनुसार अटकेची नोटीस न दिल्याचा युक्तिवाद केला. पोलिसांकडून सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाहूनच अटक केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न झाला. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अटक बेकायदेशीर ठरवत आरोपींना सोडण्याचे आदेश दिले. हे सहाही आरोपी न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडून रस्त्यावर येताच, सिटी चौक पोलिसांनी त्यांना पुन्हा ताब्यात घेतले. आता सर्व कायदेशीर त्रुटी दूर करून आणि रीतसर प्रक्रिया पार पाडून या सर्व आरोपींना सोमवारी (दि. २७) पुन्हा न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. गतवर्षी मुकुंदवाडीतील खुनाच्या गुन्ह्यातही असाच प्रकार घडला होता, हे विशेष.

फॉर्च्यूनरमधून दांडे काढले; पाठीत खुपसला चाकू

२५ जुलै रोजी रात्री सलीम अली सरोवर व चंपा चौक परिसरात आरोपींनी पुन्हा आमेर यांच्याशी वाद घातला. रात्री १२ वाजेच्या सुमारास शाहीदने आमेरला फोन करून 'आझाद कॉलेज किंवा रोजाबाग येथे ये, आपण वाद मिटवून टाकू,' असे सांगितले. आमेरला संशय असल्याने त्यांनी नकार दिला. रात्री १२.३५ वाजेच्या सुमारास नासेर हा त्याचे मित्र अदिल आणि मुझफ्फरसोबत शाहीदच्या रोजाबाग येथील घरासमोर पोहोचला. तिथे आरोपीनी फॉर्च्यूनर गाडीमधून (एमएच-२०-ईवाय-७३७३) दांडे आणि रॉड काढले. घाबरलेल्या नासेर आणि अदिल यांनी दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता विद्यालंकार शाळेसमोर आरोपी शहेबाज याने धावत्या दुचाकीवरील नासेरला पकडून खाली ओढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आरोपी अविनाश भोसले याने नासेरच्या पाठीत चाकू खुपसला. नासेर खाली पडताच आरोपी शेख कदीर ऊर्फ माया याने दांड्याने आणि रॉडने नासेरच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नासेरला आमेर आणि मित्रांनी घाटीत नेले. मात्र पहाटे १.४५ वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT