Youth Murdered School Ground  (Pudhari File Photo)
छत्रपती संभाजीनगर

Youth Murdered School Ground | शाळेच्या मैदानावर तरुणाची गळा चिरून हत्या

एसएफएस शाळेच्या मैदानावर एका तरुणाची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : एसएफएस शाळेच्या मैदानावर एका तरुणाची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.१४) रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सुरेश भगवान उंबरकर (अंदाजे वय २५, रा. कैलास नगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश हा त्रिमूर्ती चौक भागात अंडा आम्लेट गाडीवर काम करत होता. एसएफएस शाळेच्या पाठी मागील मैदानावर मंगळवारी रात्री तो एकासोबत दुचाकीने आला होता. मैदानावर आजूबाजूला काही तरुण नेहमीच बसलेले असतात. काही वेळातच सुरेश उंबरकर हा वाचवा, वाचवा असे ओरडत पळत आला. तेव्हा काही मुलांनी रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिसांच्या डायल ११२ ला संपर्क करून एकाला चाकू मारला असल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच जवाहर नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार, उपनिरीक्षक मारुती खिल्लारे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती.

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार, सिटी चौक ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनीही घटनास्थळी पाहणी केली. फॉरेन्सिकच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. सुरेशचा गळा धारदार शस्त्राने चिरून हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. गुन्हे शाखेची दोन पथके आरोपीच्या मागावर आहेत. सुरेशचे कुटुंबीय घटनास्थळी आले होते. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर रात्री एकच्या सुमारास मृतदेह घाटीत रवाना केला. सुरेश कोणासोबत मैदानावर आला होता याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. त्यानंतरच त्याच्या हत्येचा उलगडा होईल असे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT