चाकूसह त्याचा साथीदार. हातात पिस्तूल घेतलेला आरोपी संघपाल आणि हा फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला होता. घटनास्थळी खाली पडलेले पिस्तूल. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Gang War : सातारा-देवळाईत गँगवॉर

पाठलाग करत कोयत्याने हल्ला : पिस्तूल खाली पडल्याने अनर्थ टळला : म्हाडा कॉलनीतील थरार

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मागील शिवजयंतीला नाचू न दिल्याच्या रागातून तरुणाचा सिनेस्टाईल पाठलाग करत देवळाईतील म्हाडा कॉलनीत जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मदतीसाठी आलेल्या तरुणावर एका अल्पवयीन गुंडाने कोयत्याने सपासप वार केले. यावेळी मुख्य आरोपीने हल्ल्यासाठी पिस्तूल काढले ते त्याच्या हातून खाली पडल्याने मोठा अनर्थ टळला.

हा थरार शुक्रवारी (दि.१९) दुपारी दीड वाजेच्या सुमारास म्हाडा कॉलनीत घडला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात संघपाल वाटोडे आणि त्याच्या अल्पवयीन साथीदारांसह ५-६ जणांवर गुन्हा दाखल करून वाटोडे व अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित प्रदीप घोडके (१९, रा. म्हाडा कॉलनी) आणि त्याचे मित्र बालाजी जाधव, अक्षय राजगुरू हे शुक्रवारी दुपारी दुचाकीवरून बिर्याणी खाण्यासाठी सातारा परिसराकडे जात होते. हायकोर्ट कॉलनीजवळील नाल्याजवळ आरोपी संघपाल वाटोडे, त्याचा अल्पवयीन साथीदार आणि इतर ५-६ जण बसलेले दिसले.

सुमितला पाहताच संघपालने शिवीगाळ करत हत्यारांचा धाक दाखवला. आरोपींकडे हत्यारे पाहून घाबरलेल्या सुमित आणि त्याच्या मित्रांनी दुचाकी न थांबवता म्हाडा कॉलनीकडे धाव घेतली. वाटेतच सुमितने भाऊ प्रशांतला फोनवरून संघपाल आणि त्याचे मित्र चाकू घेऊन पाठलाग करत असल्याचे सांगितले.

पिस्तूल पडले अन् झटापट झाली

प्रशांतवर हल्ला होत असतानाच संघपाल वाटोडे हा स्वतःजवळील पिस्तूल लोड करत होता. मात्र, गडबडीत ते पिस्तूल खाली पडले. पिस्तूल पडताच सुमितच्या मित्रांनी संघपालला पकडले. हे पाहून संघपालच्या साथीदारांनी सुमित आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली व अल्पवयीन साथीदाराला तेथून सोबत नेले. संघपालने चाकूचा धाक दाखवत स्वतःची सुटका करून घेतली. जाताना या टोळक्याने सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली.

सोशल मीडियावर लाईव्ह करून खुनाची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत घोडके याचे संघपाल वाटोडे आणि त्याचा अल्पवयीन साथीदार यांच्याशी शिवजयंतीमध्ये किरकोळ वाद झाला होता. तेव्हापासून दोघेही प्रशांतवर खुन्नस ठेऊन होते. सोशल मीडियावरही प्रशांतला तुझा गेम करणार अशा धमक्या देण्यात आल्या होत्या. वाटोडे आणि त्याचा अल्पवयीन साथीदार सोशल मीडियावर हातात पिस्तूल, चाकू असलेले फोटो टाकून दहशत निर्माण करतात. प्रशांतला आरोपींनी सोशल मीडियावर लाईव्ह करून गोळ्या घालून मर्डर करण्याची धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे या आरोपींकडे पिस्टल आले कुठून? नशेपाणी, गुन्हेगारीच्या टोळ्यांना कोणाचे पाठबळ आहे? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

अल्पवयीन मुलाकडे पिस्तूल आले कुठून

या घटनेत अल्पवयीन मुलाकडेही आणखी एक पिस्तूल असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भरदिवसा झालेल्या या गँगवॉरमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणी सुमित घोडके याच्या तक्रारी-वरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी संघपाल वाटोडे व त्याच्या अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस उपनि-रीक्षक नंदकुमार भंडारे पुढील तपास करत आहेत.

भावावर कोयत्याने वार

सुमित म्हाडा कॉलनीत पोहोचताच आरोपी संघपाल वाटोडे, त्याचा अल्पवयीन साथीदार आणि इतर जण दुचाकीवरून तिथे धडकले. भावाच्या मदतीसाठी प्रशांतही घराबाहेर आला होता. काही समजण्याआधीच अल्पवयीन साथीदाराने प्रशांतवर थेट कोयत्याने वार केले. यात प्रशांत गंभीर जखमी झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT