Young woman raped on the pretext of marriage; Accused arrested
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मित्राच्या भावाने ओळख करून घेत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी २४ वर्षीय तरुणीने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपी प्रणव प्रभाकर कस्तुरे (२१, रा. मुकुंदवाडी) यास अटक केली आहे. न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही घटना जानेवारी २०२५ ते एप्रिल २०२५ या दरम्यान घडली आहे. पीडितेची आरोपीशी ओळख त्याच्या मित्रामार्फत झाली. त्यानंतर प्रणवने तिला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावून माझे तुझ्यावर प्रेम आहे, आपण लग्न करू असे सांगत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर एप्रिलमध्ये पुन्हा त्याने हाच प्रकार केला. पीडितेने लग्नाबाबत विचारणा केली असता प्रणव सातत्याने टाळाटाळ करू लागला. नंतर तिच्या लक्षात आले की, आरोपीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू आहेत. पीडितेने हा प्रकार प्रणवच्या घरी जाऊन सांगितल्यावर त्याच्या आईने येथे राहू नका, निघून जा अशी धमकी दिली. त्यानंतर प्रणवने पीडितेला फोन करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडितेने थेट मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली असून, पुढील तपास उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे करीत आहेत.