Sambhajinagar Crime News : पोलिस भरतीच्या सरावावरून परतणाऱ्या तरुणीचा विनयभंग File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : पोलिस भरतीच्या सरावावरून परतणाऱ्या तरुणीचा विनयभंग

तुम्ही खूप भारी दिसताय, लव्ह यू, असे म्हणत तरुणीचा विनयभंग केला.

पुढारी वृत्तसेवा

Young woman molested while returning from police recruitment training

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पोलिस भरतीच्या सरावावरून दुचाकीने घरी परतणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा पाठलाग करून रस्त्यात अडवून तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग करणाऱ्या तरुणाला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोरवाडे यांनी तीन महिन्यांचा कारावास आणि पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. गगन तफज्जुल गगन अनिस (२०, रा. सेव्हनहिल) असे आरोपीचे नाव आहे.

प्रकरणात पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडिता पोलिस भरतीची तयारी करत होती. ३० जून २०२५ रोजी पहाटे ती टी. व्ही. सेंटर चौकातील पॉवर हाऊस मैदानावर पोलिस भरतीच्या सरावासाठी गेली होती. सकाळी ७वाजेच्या सुमारास घरी परतत असताना विद्यानगर परिसरात एका अनोळखी तरुणाने त्याची दुचाकी तिच्या स्कुटीसमोर आडवी लावली.

तुम्ही खूप भारी दिसताय, लव्ह यू, असे म्हणत तिचा विनयभंग केला. तरुणीने आरडाओरडा करत विरोध केल्यानंतर आजूबाजूचे नागरिक जमा होऊ लागल्याचे पाहून आरोपी तेथून पळाला. मात्र काही अंतरावर त्याने पुन्हा तिचा पाठलाग सुरू केला. यावेळी तरुणीने पुन्हा आरडाओरडा केल्याने नागरिकांनी आरोपीला पकडून चोप दिला.

दरम्यान, डायल ११२ वर माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने घटनेच्या पंधरा दिवसांपूर्वीही तिचा रस्ता अडवून अंगाला जबरदस्तीने हात लावत विनयभंग केला होता. त्या वेळी भीतीपोटी तिने कोणाकडेही याची वाच्यता केली नव्हती. प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

५ हजाराचा दंड ठोठावला

तपास अधिकारी उपनिरीक्षक विनोद भालेराव यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहाय्यक लोकाभियोक्ता राजू पहाडीया यांनी तीन साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी गगन तफञ्जुल याला दोषी ठरवून बीएनएसच्या कलम ७५ अन्वये तीन महिन्यांचा कारवास आणि ५ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार सय्यद मुख्तार यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT