Crime News Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : देभेगाव येथे शेतीच्या वादातून पुतण्याचा खून

कारने उडवून अमानुष मारहाण; पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

देवगाव रंगारी : कन्नड तालुक्यातील देभेगाव येथे शेतीच्या वादातून चुलत नात्यातील कुटुंबीयांमध्ये झालेल्या संघर्षाने शुक्रवारी रक्तरंजित वळण घेतले. तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्याकडे निघालेल्या तरुणाला भरधाव जीपने उडवून दिल्यानंतर जखमी अवस्थेतही बेदम मारहाण करण्यात आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. योगेश कानिफनाथ थोरात (35, रा. देभेगाव, ता. कन्नड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर या प्रकरणी प्रल्हाद जगन्नाथ थोरात याच्यासह इतर आरोपींविरुद्ध देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देभेगाव येथील गट क्रमांक 78 मधील शेतीच्या मालकी व बांधाच्या वादातून थोरात कुटुंबीयांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. शुक्रवारी (दि. 29) सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास काका जगन्नाथ रंगनाथ थोरात आणि पुतण्या योगेश कानिफनाथ थोरात यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या झटापटीत जगन्नाथ थोरात यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

या घटनेची तक्रार देण्यासाठी योगेश थोरात आणि त्यांची पत्नी दुचाकीवरून देभेगाव येथून देवगाव रंगारी पोलिस ठाण्याकडे निघाले होते. दरम्यान, जगन्नाथ थोरात यांचा मुलगा प्रल्हाद थोरात याला वडिलांना झालेल्या मारहाणीची माहिती मिळाल्यानंतर त्याने मित्रासह कारने पाठलाग करून देभेगाव गावाच्या वेशीजवळ भरधाव कारने योगेश थोरात यांच्या दुचाकीवर घातली.

या धडकेत योगेश आणि त्यांची पत्नी रस्त्यावर फेकले गेले.मात्र एवढ्यावरच आरोपी थांबले नाहीत. त्यांनी जखमी अवस्थेत पडलेल्या योगेश थोरात यांना लाथाबुक्क्यांनी व काठ्यांनी जबर मारहाण केल्याने उपचारा दरम्याचा त्यांचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT