E Vehicle : ई-वाहन घ्या म्हणता, पण चार्जिंगची सोय कुठे ? file photo
छत्रपती संभाजीनगर

E Vehicle : ई-वाहन घ्या म्हणता, पण चार्जिंगची सोय कुठे ?

संभाजीनगर व जालन्यात ४१ हजार ई-वाहनांसाठी केवळ २०१ चार्जिंग स्टेशन; फास्ट चार्जिंगच्या सुविधेचाही अभाव

पुढारी वृत्तसेवा

You say "buy an electric vehicle," but where are the charging facilities?

जे.ई. देशकर

छत्रपती संभाजीनगर : प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व घटविण्यासाठी सरकारकडून ई-वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. ई-वाहनांचे प्रमाण वाढवण्यासाठी जुन्या वाहनांच्या स्क्रॅपिंगसंदर्भात कडक नियम करण्यात आले आहेत. मात्र, ई-वाहनांच्या संख्येच्या तुलनेत चार्जिंग सेंटरची उपलब्धता कमी असल्याने ई वाहन घ्या म्हणता चार्जिंगची सोय कुठे असा प्रश्न वाहनधारक उपस्थित करत आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७४, तर जालना जिल्ह्यात २७ केंद्रांचा समावेश आहे. दोन्ही जिल्ह्यांत सुमारे ४१ हजार ९३१ ई-वाहने आहेत. म्हणजे सरासरी एका चार्जिंग स्टेशनच्या वाट्याला सुमारे २०९ ई-वाहने येतात. ही सरासरी केवळ तुलनात्मक आहे. कारण अनेक ई-वाहने घर किंवा खासगी ठिकाणी चार्ज केली जातात.

तरीही ई-वाहनांची संख्या वाढत असताना सार्वजनिक चार्जिंग नेटवर्कची क्षमता, स्थान आणि उपलब्धता यांचे नियोजन महत्त्वाचे ठरते. पायाभूत सुविधांचे नियोजन न करताच ई वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात येत आहे. प्रोत्साहानाचा चार्ज फुल्ल मात्र पायाभूत सुविधांची बॅटरी लो असल्याने ई वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

फास्ट चार्जिंगची क्षमताही महत्त्वाची

एक वाहन चार्ज करण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते. ही प्रक्रिया खूप वेळखाऊ असल्याने अनेकांचा याकडे ओढा कमी झाला आहे. त्यामुळे फास्ट चार्जिंग क्षमता असलेले स्टेशन उभारणे गरजेचे आहे. त्याच बरोबर एकावेळी किती वाहने चार्ज होऊ शकतात आणि केंद्र किती तास सुरू असते, याचे नियोजन करून माहिती उपलब्ध करण्याची गरज असल्याचे मत वाहनधारकांनी व्यक्त केले-

वाहने वाढली, आता चार्जिंगचा प्रश्न

सरकारचे ई-वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी धोरणात्मक प्रयत्न आहेत. जुन्या वाहनांचे स्क्रॅपिंग, वाहनांच्या विविध प्रोत्साहन योजनांमुळे भविष्यात ई-वाहनांची संख्या वाढणार आहे. मात्र, वाहन कुठे आणि किती वेळात चार्ज होणार, याचेही नियोजन आवश्यक आहे. शहरातील प्रमुख रस्ते, महामार्ग, बाजारपेठा, शासकीय कार्यालये, पार्किंगस्थळे, पेट्रोल पंपांच्या धर्तीवर चार्जिंग हब आणि ग्रामीण भागातील प्रमुख बाजारपेठा या ठिकाणी चार्जिंगची सुविधा उपलब्ध केली तरच चार्जिंगचा प्रश्न सुटणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT