World Vitiligo Day: White patches leave their mark not only on the skin but also on the mind.
राहुल जांगडे
छत्रपती संभाजीनगर : पांढरे डाग, कोड या आजाराचे दुष्परिणाम त्वचेवर नाहीत, तर रुग्णांच्या मनावरही होतात. मित्र-मैत्रीण, नातेवाईक हिणवतात. तरुणींना लग्नाचे स्थळ नाकारले जाते. आजारापेक्षा समाजाची वागणूक अधिक वेदना देऊन जाते. हा अनुभव असंख्य व्हिटिलिगो अर्थात कोडग्रस्त रुग्णांना दररोज येतो. त्यामुळे अनेक रुग्ण नैराश्य, चिंतेच्या गर्तेत लोटले जातात. असे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुपम टाकळकर म्हणाले.
२५ जून हा जागतिक व्हिटिलिगो दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश केवळ एका त्वचारोगाबद्दल माहिती देणे नाही, तर त्या रुग्णांबद्दल समाजात असलेली भीती, गैरसमज आणि भेदभाव दूर करणे हा आहे. डॉ. टाकळकर म्हणाले, व्हिटिलिगो हा स्वयंप्रतिकार विकार आहे.
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्याच रंग निर्माण करणाऱ्या पेशींवर हल्ला करते. आनुवंशिकता, ताणतणाव, काही रासायनिक घटक आणि प्रतिकारशक्तीतील बदल यांचा त्यात सहभाग असू शकतो. रुग्णाला या आजारासाठी दोषी धरता येत नाही. हा संसर्गजन्य आजार नाही. स्पर्शाने, हस्तांदोलनाने, एकत्र जेवणाने, कपडे वापरल्याने किंवा रक्तसंबंधाने तो पसरत नाही.
तरीसुद्धा आजही अनेक गैरसमज समाजात रुजलेले आहेत. विज्ञानाच्या दृष्टीने या सर्व गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत. त्वचारोगतज्ज्ञ म्हणून गेल्या अनेक वर्षांत मी हजारो व्हिटिलिगो रुग्ण पाहिले आहेत. अनेकांच्या डोळ्यांत मला एकच प्रश्न दिसतो. "डॉक्टर, मी इतरांसारखा दिसेन का? हा प्रश्न त्वचेबद्दल नसतो. तो स्वीकाराबद्दल असतो.
आधुनिक औषधोपचार उपलब्ध
व्हिटिलिगोच्या उपचारांमध्ये मोठी क्रांती होऊन आधुनिक औषधे, फोटोथेरपी, एक्सायमर लेसर, मायक्रोपिगमेंटेशन, त्वचा प्रत्यारोपण तंत्र आणि नव्या पिढीतील जैविक उपचार उपलब्ध आहेत. अनेक रुग्णांमध्ये हरवलेला रंग पुन्हा मिळवणे शक्य झाले आहे. जितक्या लवकर निदान आणि उपचार सुरू होतात तितके परिणाम चांगले मिळतात.
त्वचेचा रंग मूल्य ठरवत नाही
पण उपचारांपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या रुग्णाला समाजाकडून मिळालेली एक सकारात्मक प्रतिक्रिया, त्याच्या मनाला औषधापेक्षाही जास्त बळ देऊ शकते. त्वचेचा रंग माणसाचे मूल्य ठरवत नाही. पांढरे डाग असलेले असंख्य खेळाडू, कलाकार, मॉडेल्स आणि व्यावसायिक व्यक्ती व्हिटिलिगोसह अभिमानाने जगत आहेत.