केकी मूस pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

World Photography Day | केकी मूस : प्रेयसीची पन्‍नास वर्षे वाट पाहणारा छायाचित्रकार

World Photography Day | चाळीसगावात वास्‍तव्‍य, टेबल टॉफ फोटोग्राफीमुळे जगभर प्रसिद्धी

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरहून दोन तासाच्या अंतरावर असणार्‍या चाळीसगाव येथे आपल्‍या प्रेयसीची जवळपास पन्‍नास वर्षे वाट पाहणार्‍या विश्‍वविख्यात छायाचित्रकार केकी मूस यांची प्रेमकथा काही औरच..प्रेमकथेप्रमाणेच ते चर्चेत राहिले उत्‍कृष्ट छायाचित्रकार म्‍हणून. टेबल-टॉप फोटोग्राफीमुळे त्‍यांना जगभर प्रसिद्धी मिळाली.

तीनशेहून अधिक छायाचित्रांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणार्‍या केकींना फोटोग्राफीचे अगाध ज्ञान होेते. स्थिर चित्रण, पोर्ट्रेट्स, अ‍ॅनिमल स्टडीज, व्यंगचित्रात्मक फोटोग्राफी यासारखे प्रकार त्‍यांनीड हाताळले होत. त्यांची विच, बेगर विदाऊट, शिव पार्वती, विंटर, तृषार्त, वात्सल्य ही छायाचित्रे विशेष गाजली. घरातच त्‍यांनी कैद करून घेतल्‍यामुळे टेबलटॉप फोटोग्राफी म्‍हणजे घरातील वस्‍तू व टेबलाचा वापर करून फोटो काढणे. टेबलटॉपची त्‍यांनी १३ हजार छायाचित्रे काढली.

टेबलटॉप फोटोग्राफीतील भारतातले पहिले महान कलाकार जे. एन. उनवाला यांच्याकडून केकींनी टेबलटॉप फोटोग्राफी देखील शिकून घेतली होती. वस्तूंची कल्पक मांडणी करुन त्यांचा योग्य उंचीवरून काढलेल्या तसेच सावल्यांवर विशेष भर असणार्‍या छायाचित्राला टेबलटॉप फोटो म्हणतात. टेबलटॉप फोटोग्राफीच्या माध्यमातून काढलेलं छायाचित्र जिवंत असल्याचा भास होतो. या टेबलटॉप फोटोग्राफीसाठी लागणार्‍या चीजवस्तू केकींनी घरातच जमवल्या होत्या. या वस्‍तूंची संख्या जवळपास दीड हजारावर आहे. छायाचित्रकाराशिवाय त्‍यांची ओळख चित्रकार, संगीतप्रेमी, संगीतसंग्राहक, उत्तम शिल्पकार, काष्ठशिल्पकार आणि ओरिगामिस्ट अशी होती.

चाळीसगाव खानदेश मराठवाडा सीमेवरील तालुक्‍याचे ठिकाण. एकदा एका जागतिक स्‍पर्धेसाठी केकींना फोटो पाठवायचा हेता. परंतु मनाजोगे मॉडेल त्‍यांना मिळेना. त्यांनी देवाकडे प्रार्थना केली की एक मॉडेल पाठवून दे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी केकी त्यांच्या घराच्या व्हरांड्यात केस विंचरत असताना तेथून जाणाऱ्या एक आजी त्यांना पाहून ते वैद्य असल्याचे समजून त्यांच्याकडे औषध मागायला घरात शिरली. त्या आजीला पाहून केकींच्या मनातील कल्‍पना प्रत्‍यक्षात उतरण्यास मदत झाली.

केकींनी तिच्या 4 आण्याच्या मोळीचे तिला 5 रुपये दिले आणि फोटो काढण्यासाठी तयार केले. तिचे जवळजवळ 40 फोटोग्राफ घेतले आणि नंतर आपल्या डार्करूममध्ये अखंड 24 तास त्यावर काम करून त्यातील एक फोटो स्पर्धेसाठी पाठवला. या फोटोला त्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले.

इंग्‍लडमध्ये शिक्षण

कैखुसरो माणेकजी मूस हे त्‍यांचे पूर्ण नाव असले तरी त्यांची आई त्यांना 'केकी' म्हणायची. मुंबईतल्या मलबार हिलसारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत २ ऑक्टोबर १९१२ रोजी एका पारशी कुटुंबात (पिरोजा आणि माणेकजी फ्रामजी मूस) केकींचा जन्म झाला. मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून केकी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. १९३५ मध्ये लंडनमधील 'द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड'मध्ये प्रवेश घेतला. केकींनी चार वर्षांत त्यांचा कमर्शियल आर्टचा डिप्लोमा पूर्ण केला.

याच अभ्यासक्रमात फोटोग्राफी हा विषय देखील होता. १९३७ साली केकींनी त्याचाही अभ्यास केला. नंतर 'रॉयल सोसायटी ऑफ आर्ट ऑफ ग्रेट ब्रिटन' या संस्थेने त्यांना मानद सभासदत्व दिले. केकी अमेरिका, जपान, रशिया, स्वित्झर्लंडला गेले होते. तेथे त्‍यांनी फोटोग्राफीची अनेक प्रदर्शने पाहिली. अनेक कलाकारांना भेटले आणि 1938 साली भारतात परत आले. रेम्ब्राँ हा डच चित्रकार केकींचे प्रेरणास्थान होता. रेम्ब्राँ या चित्रकाराचा त्यांच्या मनावर खूप प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बंगल्याचे 'आशीर्वाद' हे नाव बदलून 'रेम्ब्राँज रिट्रीट' असे ठेवले होेते.

अद्‌भूत प्रेमकथा, प्रेयसीची ५० वर्षे वाट पाहिली

मुंबईत शिक्षण घेत असताना केकींची निलोफर मोदी नावाच्या मुलीशी मैत्री झाली. नंतर त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झाले. शिक्षण पूर्ण करून केकी मूस यांनी चाळीसगाव येथे आपल्या आईवडीलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. (त्‍यांच्या वडिलांचा जामोद, चाळीसगाव येथे व्‍यवसाय होता. त्‍यांनी केकींना मुंबईत मामाकडे शिक्षणासाठी पाठविले होेते.) त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आणि निलोफरच्या नात्यात कायमचा दुरावा आला. कारण केकींच्या घरची आर्थिक स्थिती चांगली असली तरी त्यांच्या तुलेनेत निलोफर या श्रीमंत कुटुंबातील होत्या. त्यामुळे निलोफर यांचे आईवडील या नात्याबाबात फार खुश नव्हते, तरीही त्यांनी लग्नाला होकार दिला होता. परंतु, निलोफर यांच्या आईवडीलांना त्यांचं मुंबईसोडून चाळीसगावसारख्या ठिकाणी राहायला जाणे आवडले नाही.

निलोफर यांची केकींसोबत चाळीसगावला जाण्याची तयारी असूनही त्यांच्या आईवडीलांनी निलोफर यांनी जाण्याची परवानगी दिली नाही.परंतु केकी मुंबईवरून चाळीसगावला निघाले असताना निलोफरने त्यांना सांगितले की तू हो पुढे.. मी पंजाब मेलने आलेच..रात्रीचे जेवण सोबत करू या...ठरल्याप्रमाणे रात्री अकराच्या सुमारास केकी स्‍टेशनवर आले,पण निलोफर आलीच नाही. पुढील तब्बल ५० वर्षे, रोज रात्री पंजाब मेल येईपर्यंत त्यांच्या घराचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या असायच्या, तिच्या स्वागतासाठी पुष्पगुच्‍छ ते तयार करून ठेवत असत.

पंजाब मेल गेल्‍यानंतरच ते जेवण करीत हा नियम त्‍यांनी शेवटच्या क्षणापर्यं पाळला. केकींना पंजाब मेलची एवढी माहिती झाली होती की, पंजाब मेलमध्ये किती डब्बे आहेत डब्यांचा आवाज याविषयी ते बिनचूक सांगत. असेही म्हणतात की, केकींचा असणारा कुत्रा पंजाब मेलची वेळ झाली की भुंकत असे. ताे सुद्धा त्‍यांना प्रेयसीची आठवण देत असे. निलोफर ही इंग्‍लडला गेली, तेथेच तिने विवाह केला अशी माहिती जाणकार देतात.

५० वर्षांत फक्त दोनदाच घराबाहेर पडले

१९३९ पासून ते १९८९ अशी पन्‍नास वर्षे केकींनी चाळीसगाव रेल्‍वे स्‍टेशनजवळ असलेल्‍या आपल्‍या घरात घालविली. या काळात ते फक्‍त दोन वेळा घराबाहेर पडले. १९५७ ला त्यांच्या आईच्या अंत्यविधीसाठी ते संभाजीनगरात गेले होते. दुसर्‍यांदा भूदान चळवळीचे नेते विनोबा भावे यांचे चित्र काढण्यासाठी ते १९७० दरम्यान चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या वेटींग रूममध्ये गेले होते. पण , विनोबांनी कॅमेर्‍यासमोर उभे राहण्यास व पोज देण्यास नकार दिल्‍यामुळे हे छायाचित्र प्रत्‍यक्षात येवू शकले नाही.

तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे प्रवासात असताना केकींना चाळीसगावच्या रेल्वे स्थानकावर भेटायला बोलाविले होते. तेव्हा त्यांच्या आमंत्रणासही त्यांनी नम्रपणे नकार दिला होता. शिवाय त्यांनाच निरोप पाठवला होता की तुम्हाला जर माझ्या हातुन व्यक्ती चित्र तयार करून हवं असेल तर तुम्हाला माझ्या घरी यावे लागेल. त्‍याप्रमाणे नेहरू केकींकडे गेले होते, त्‍यासाठी रेल्‍वे तासभर स्‍थानकावर थांबून ठेवण्यात आली होती.

कल्पनाचित्रांचा खेळ

टेबल टॉप फोटोग्राफी म्‍हणजे कल्‍पनाचित्रांचा खेळ, मनातले एखादे चित्र उपलब्ध वस्तूंच्या साहाय्याने उभे करावे, त्याला प्रकाशयोजना, त्रिमितीची उत्तम जोड द्यावी आणि या साऱ्या दृश्याचे छायाचित्र काढावे. एका छायाचित्रात त्‍यांनी केवळ मीठ, भुसा, कापूस, वाळलेल्या काड्या यातून त्यांनी तो गोठवणारा हिवाळा उभा केला. या दृश्यावर एक धुरकट प्रकाश टाकला आणि छायाचित्र घेतले. झाले, भल्याभल्यांना या चित्रातून जागोजागीचा ‘विंटर’ दिसू लागला. यात खुद्द पंडित नेहरूदेखील होते. हे चित्र पाहिल्यावर नेहरू एवढेच म्हणाले, ‘धिस इज माय नेटिव्ह प्लेस. मि. मूस, टेल मी व्हेन यू हॅव व्हिजिटेड काश्मीर?’

‘ ‘ऑफ डय़ूटी’मध्ये जवानाचा एक बूट दाखवला असून, त्याच्यात एक हसरी बाहुली खोचलेली आहे. बाहुलीतून जणू तो बूटच हसत आहे. दिवसभर त्या जवानाबरोबर ‘डय़ूटी’ करणाऱ्या त्या बुटालाही थोडा वेळ विश्रांती मिळाली की हायसे वाटते, आनंद होतो. पहिल्यात हा आनंद, तर दुसऱ्यात ती भीती!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT