World Cat Day Special: Cat craze grows among Gen Z
जे. ई. देशकर
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पूर्वी घरातील उंदीर कमी करण्यासाठी मांजर पाळल्या जायचे. आता मात्र मांजर म्हणजे पेट कम्पॅनियन आणि सोशल मीडियावरील क्यूट कंटेंटचा भाग बनले आहे. विशेषतः जेन - झीमध्ये मांजर पाळण्याची क्रेझ झपाट्याने वाढत असून, पर्शियनसह डॉल फेस, परशन ट्रिपल कोट, इमालियन, कालाको, शॉर्ट टेल आदी विदेशी जातींच्या मांजरींना मोठी मागणी आहे. मांजराच्या संगोपनासाठी कॅट फूडपासून ग्रुमिंग, लिटर बॉक्स आणि खेळण्यांपर्यंत स्वतंत्र खर्च करण्याची तयारीही तरुणाई दाखवत आहे. शहरात विदेशी मांजरींची संख्या सुमारे दहा हजारांच्या आसपास असण्याची शक्यता प्राणी कल्याण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
एकटेपणा, बदलती कौटुंबिक रचना आणि व्यस्त जीवनशैली यामुळे तरुणांमध्ये पाळीव प्राण्यांकडे भावनिक सोबती म्हणून पाहण्याचा कल वाढत आहे. मांजरांना तुलनेने कमी जागेत सांभाळता येत असल्याने फ्लॅट संस्कृतीतही त्यांना पसंती मिळत आहे. सोशल मीडियावर मांजरांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याचे प्रमाण वाढल्याने या कॅट कल्चरला आणखी चालना मिळत आहे.
यात पर्शियनसह विविध विदेशी जातींच्या मांजरी खरेदी करण्याकडे तरुणांचा कल आहे. जाती आणि गुणवत्तेनुसार मांजरींची किंमत साधारण ५ हजारांपासून २५ हजार रुपयांपर्यंत असू शकते. मात्र खरेदीची किंमत ही सुरुवातीचीच बाब असून, त्यानंतर खाद्य, लसीकरण, ग्रुमिंग आणि आरोग्य तपासणीचा नियमित खर्चही करावा लागतो-
विदेशी मांजरींच्या वाढत्या क्रेझमध्ये देशी मांजरींकडे दुर्लक्ष होऊ नये. देशी मांजरी तुलनेने तगड्या आहेत. मांजरींना मारहाण करणे, विष देणे किंवा दुसऱ्या ठिकाणी नेऊन सोडणे टाळावे. त्यांच्याशी दयाळूपणे वागून निर्बीजीकरणाचा मार्ग स्वीकारल्यास माणूस आणि प्राणी यांच्यातील सहजीवन अधिक सुसंवादी होऊ शकते.- जयेश शिंदे, लाईफ केअर अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन
मांजर पाळणार मग या गोष्टी अनिवार्य
दर तीन महिन्यांनी जंतनाशक औषध, नियमित रेबीज लसीकरण, गरजेनुसार ग्रुमिंग आणि नखे कापणे, स्वच्छ लिटर बॉक्स आणि ताजे पाणी, वय व आरोग्यानुसार योग्य कॅट फूड, वेळोवेळी पशुवैद्यकीय तपासणी, मांजराचे निर्बीजीकरण करण्याबाबत पशुवैद्यकाचा सल्ला
जेन-झेडच्या पेट कल्चरची नवी समीकरणे
पूर्वी : मांजर-उंदीर पकडणारे प्राणी
आता : मांजर घरातील सदस्य + भावनिक सोबती + सोशल मीडिया कंटेंट
तरुणाईचा खर्च : कॅट फूड लिटर बॉक्स ग्रुमिंग खेळणी लसीकरण पशुवैद्यकीय तपासणी