Woman molested after entering house, man in police custody for threatening her
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा घरात घुसून महिलेला धमक्या देत तिचा हात पिरगळून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला सातारा पोलिसांनी बुधवारी (दि.८) बेड्या ठोकल्या. परमानंद दत्तात्रय वाघमारे (३७, रा. मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव असून, त्याला ३ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. एन. गोवरीकर यांनी दिले.
प्रकरणात ३६ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १० वाजता त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने स्वतःची ओळख न देता शिवीगाळ करत फिर्यादींच्या पतीकडे पैसे मागितले आणि तुमच्या घरी येऊन गोळ्या घालीन, अशी धमकी दिली.
या घटनेची माहिती फिर्यादींनी आपल्या पतीला दिली. त्यांनी त्या क्रमांकावर फोन करून विचारणा केली असता, संबंधित व्यक्तीने त्यांनाही शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत तक्रार नोंदवण्यासाठी सातारा पोलिस ठाण्यात गेले असताना, रात्री अंदाजे १०.३० वाजता तोच व्यक्ती हातात लाकडी दांडा घेऊन त्यांच्या घरी जबरदस्तीने घुसला. त्याने पीडितेला शिवीगाळ करून पीडितेचा हात पिरगाळून विनयभंग केला.
तिने लहान बाळासह स्वतःचा बचाव करत त्या व्यक्तीला बाहेर काढले. त्यानंतर तो घराबाहेर उभा राहून खिडक्यांवर दांडा मारून तोडफोड करत, आरडाओरड करत धमक्या देत राहिला. फिर्यादींचे पती पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले असता तो व्यक्ती आरडाओरडा करत होता. पोलिसांनी तात्काळ अटक केली.
त्याच्याकडून लाकडी दांडा जप्त करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता सहाय्यक सरकारी वकील कच्छवे आणि पीडितेच्यावतीने अॅड. सचिन शिंदे यांनी युक्तिवाद करून आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. अॅड. शिंदे यांना अॅड. करण शेवत्रे, कुणाल भुसारे, यश साळुंके यांनी सहकार्य केले.