छत्रपती संभाजीनगर : वडगाव कोल्हाटी येथील हत्याकांड केवळ क्षणिक रागातून झालेले नाही, तर यामागे २००९ पासून शिजत असलेला अनैतिक संबंध आणि ब्लॅकमेलिंगचा मोठा कट आहे. ३६ लाख रुपयांची वसुली, झटापटीत मशीनमध्ये बोटे तुटल्याचा राग आणि मलाही तुझ्या घरात पत्नी म्हणून राहायचे आहे, हा अट्टाहास... या सगळ्यातून एका निष्पाप पत्नीचा नाहक बळी गेला आहे.
महेंद्र सोनपेठकर आणि शैला यांची ओळख २००९ मध्ये एका कंपनीत झाली होती. महेंद्र तिथे मॅनेजर होता. या ओळखीचे रूपांतर अनैतिक संबंधात झाले आणि तिथूनच महेंद्रच्या गळ्याभोवती ब्लॅकमेलिंगचा फास आवळला गेला.
शैलाने महेंद्रवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करत वाळूज एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. तिने महेंद्रला ब्लॅकमेल करून वेळोवेळी तब्बल ३६ लाख रुपये उकळले होते. तरीही तिची पैशाची हाव संपली नव्हती. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, या अनैतिक संबंधात मे २०२४ मध्ये एक मोठा ट्विस्ट आला.
शैलाच्याच कंपनीत या दोघांमध्ये पैशावरून पुन्हा झटापट झाली. यावेळी महेंद्रने दिलेल्या धक्क्यामुळे शैलाचा हात मशीनमध्ये अडकला आणि तिची बोटे तुटली. याप्रकरणीही महेंद्रवर गुन्हा दाखल झाला. या घटनेनंतर शैलाचा राग अनावर झाला होता. महिन्याभरापूर्वीच तिने महेंद्रच्या घरात घुसून मलाही तुझ्यासोबत याच घरात राहायचे आहे, असा अट्टाहास धरला होता. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून तिला घरातून बाहेर काढले होते.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत साधना या अतिशय धार्मिक व शांत स्वभावाच्या होत्या. मंदिर ते घर एवढीच त्यांची दिनचर्या होती. आरोपी शैला नेहमीच साधना यांना घरी येऊन मारहाण करत होती. ती माझे बरे वाईट करेल, या भीतीपोटी साधना यांनी आपल्या सासूला घरी बोलावून घेतले होते. मात्र त्यांची भीती अखेर खरी ठरली आणि शैलाने त्यांचा घात केला.
शैलाने सपासप वार करून साधना यांचा गळा चिरला. महेंद्रने पोलिसांना बोलावल्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. रक्ताच्या थारोळ्यात साधना पडल्या होत्या. पोलिसांनी शिताफीने झडप घालून तिला ताब्यात घेतले. एका सामान्य महिलेकडे विदेशी बनावटीचे पिस्तूल आले कोठून? पतीच्या अनैतिक संबंधाची शिक्षा मात्र एका निष्पाप पत्नीला चुकवावी लागली, अशी चर्चा परिसरात सुरू होती.