Sambhajinagar Khultabad news
खुलताबाद : खुलताबाद तालुक्यातील सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावर गल्लेबोरगाव जवळ बुधवारी (दि.२९) दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. एका महिलेने धावत्या बसमधून अचानक उडी मारल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. कांताबाई योगेश मरमट (वय 40, रा. देहाडेनगर, हर्सूल सावंगी, जि. छत्रपती संभाजीनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला कन्नड आगाराच्या महामंडळाच्या एस.टी. बसने (एम.एच.१४ बी.टी.३०३८) गल्लेबोरगाव येथून बसमध्ये बसली. वेरूळचे तिकीट घेतले. प्रवास करत असताना बस पळसवाडी परिसरातून जात असताना महिलेने कोणालाही न सांगता अचानक दरवाज्याकडे जाऊन उडी मारली. ती महिला बसच्या मागील चाकाखाली आली. त्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच खुलताबाद पोलिस मनोहर पुंगळे, बीट जमादार राकेश आव्हाड, महामार्ग पोलीस सपोनि इंगोले, रामनाथ भुसारे, राठोड, शांताराम सोनवणे शरद दळवी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठविण्यात आला. पोलिसांनी चालक, वाहक तसेच प्रवाशांचे जबाब नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.