छत्रपती संभाजीनगर : शहरातील कुख्यात ड्रग्जमाफिया अश्पाक पटेल याच्या सिंडिकेटचा आर्थिक कारभार पाहणाऱ्या महिला साथीदाराला गुन्हे शाखेने अखेर बेड्या ठोकल्या आहेत. इशरत अकीब शेख (२८, रा. रवींद्रनगर, शहाबाजार) असे या महिला आरोपीचे नाव असून, ती अश्पाकच्या काळ्या धंद्यात कॅशियर म्हणून काम पाहत असल्याचे समोर आले आहे. तिच्या अटकेमुळे ड्रग्ज विक्रीतून जमवलेल्या लाखोंच्या उलाढालीचे धागेदोरे आता पोलिसांच्या हाती लागले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्पाक पटेलच्या संपूर्ण ड्रग्ज सिंडीकेटचा आर्थिक व्यवहार गेल्या वर्षभरापासून इशरत हीच हाताळत होती. एमडी ड्रग्ज आणि कोडीन सिरपच्या विक्रीतून येणारा पैसा जमा करणे, पेडलर्सना कमिशन वाटणे आणि सिंडिकेटचा हिशोब ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी तिच्यावर होती. तिने आजवर या सिंडिकेटच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल केली असून, ती थेट अश्पाकच्या संपर्कात होती.
गुन्हे शाखा आता या टोळीने ड्रग्जच्या पैशातून कुठे मालमत्ता खरेदी केली आहे का? किंवा रोख रक्कम कुठे दडवून ठेवली आहे? याचा सखोल तपास करत आहे. सिंडिकेटमधील सर्व १७ आरोपींच्या संपर्कातील लोकांचे बँक व्यवहार आणि कोणाकोणाच्या खात्यावर व्यवहार झाले, याची बारकाईने तपासणी सुरू झाली आहे. अश्पाकचे अनेक पंटर सध्या पोलिसांच्या रडारवर असून, लवकरच आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले, सहायक आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक निरीक्षक रविकांत गच्चे, सुनील जाधव, गीता शिकारे आणि पूजा इंगळे यांच्या पथकाने केली.
जिन्सीतील साम्राज्याला सुरुंग
अमली पदार्थाचा काळाबाजार करणाऱ्या विरोधात पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी कडक भूमिका घेतल्यापासून शहरात तस्कर, पेडलर्सचे धाबे दणाणले आहे. जिन्सी भागात ड्रग्जचे साम्राज्य प्रस्थापित करणाऱ्या अश्पाक पटेलच्या सिंडिकेटला सुरुंग लावल्यानंतर ड्रग्ज तस्करी करणारे बहुसंख्य सराईत गुन्हेगार, पुरवठादार जेरबंद झाले आहेत. तर काही भूमिगत झाले.
आतापर्यंत १७ ड्रग्ज तस्कर जेरबंद
एनडीपीएस कायद्यांतर्गत आतापर्यंत पाच गुन्हे दाखल आहेत. १७ आर-▶ोपींना पोलिसांनी अटक केली असून, ते सध्या हर्मूल कारागृहात आहेत. मुख्य आरोपी अश्पाक पटेल आणि त्याच्या इतर साथीदारांचा गुन्हे शाखेकडून कसून शोध घेतला जात आहे.
इशरत शेख पदवीधर
इशरत शेख ही पदवीधर असून तिने नर्सिंगचे शिक्षण घेतलेले आहे. वर्षभरापूर्वी घराशेजारीच राहणाऱ्या अश्पाक पटेलच्या ती संपर्कात आली. त्यानंतर तिने त्याच्या सिंडिकेटमध्ये काम सुरू केले. अमली पदार्थाच्या मालाचा आणि वितरणाचा सर्व व्यवहार ती पाहत होती. तिने आतापर्यंत लाखोंचे ट्रॅन्जेक्शन केल्याचे तपासात समोर आल्यानंतर गुन्हे शाखेने तिला अटक केली.