Will unite OBC, SC, ST, Muslims: Prakash Ambedkar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी, भटके-विमुक्त समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे. यावर ओबीसी, एससी, एसटी, मुस्लिम यांची मोट बांधून येणाऱ्या निवडणुकीत ओबीसींनी आपले अस्तित्व दाखवावे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (दि.१०) केले. ते ओबीसी, भटक्या-विमुक्त महासंघाच्या बैठकीला मार्गदर्शन करत होते.
ओबीसी, भटक्या-विमुक्त महासंघाची बैठक शुक्रवारी भानुदास चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रकाश आंबेडकरांनी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, ओबीसी समाजाने राजकारणाची भीती मनातून काढून टाकावी. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण ओबीसीलाच मतदान करणार हे ठासून सांगा, आपली भूमिका स्पष्ट करा, असेही आवाहन केले. दरम्यान, सुप्रीम न्यायालयाने धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्यास नकार देऊनही यासाठी आंदोलन करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले.
ओबीसीच्या आरक्षणासाठी आगामी काळात लवकरच महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ओबीसीच्या नेत्यांनी दिली. या बैठकीला केवळ ओबीसी नेत्यांनाच आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी ओबीसी, भटक्या-विमुक्त महासंघाचे निमंत्रक प्रा. किसन चव्हाण, धनगर नेते प्रभाकर बकले, ओबीसी नेते अशोक जाधव धनगावकर, महेश निनाळे यांच्यासह राज्यभरातील ओबीसी समाजाचे नेते उपस्थित होते.