

Sambhajinagar Party group leaders' meeting in the presence of Eknath Shinde
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.१०) पक्षाच्या गटप्रमुखांचा मेळावा झाला. मात्र या मेळाव्यात खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे या पिता-पुत्राच्या भाषणामुळे एकनाथ शिंदे यांची मोठी गोची झाली. शिंदे यांनी विलास भुमरे यांचे भाषण थांबवून त्यांना दुरुस्ती करायला लावली, तर संदीपान भुमरे यांच्या एका वक्तव्यावर शिंदे यांनी स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला.
शहरातील संत एकनाथ रंगमंदिरात शुक्रवारी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, रमेश बोरणारे, संजना जाधव, विलास भुमरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, भरतसिंग राजपूत, माजी महापौर नंदकुमार घोडेले आदींची उपस्थिती होती. एकनाथ शिंदे यांच्याआधी व्यासपीठावरील इतर नेत्यांची भाषणे झाली. यात भुमरे पिता-पुत्रांच्या वक्तव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
उद्धव ठाकरे यांच्या नियोजित हंबरडा मोर्चावरून खासदार संदीपान भुमरे यांनी जोरदार टीका केली. ही टीका करताना त्यांच्याकडून अनावधानाने एक वक्तव्य करण्यात आले. उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याचा अधिकार नाही. त्यांच्यापेक्षा महायुती सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत केली आहे. कुणी काहीही म्हणो, पण हंबरडा आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा फुटणार, असे संदीपान भुमरे म्हणाले. त्यावर एकनाथ शिंदे यांनी डोक्यावर हात मारून घेतला. पालकमंत्री शिरसाट यांनी लगेचच चूक लक्षात आणून दिली. त्यावर मला असे म्हणायचे आहे की, एकनाथ शिंदे साहेबांचाच बोलबाला राहणार, असे म्हणत वेळ मारून नेली.
निवडणुकीच्या नियोजनाविषयी बोलताना विधानसभा निवडणुकीला मी जवळपास २० हजार मतदान बाहेरून आणले. मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा झाला, असे विलास भुमरे म्हणाले. त्यांच्या वक्तव्यानंतर व्यासपीठावरील आणि सभागृहातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी विलास भुमरे यांना थांबवत, तुमच्या मतदारसंघातील पण बाहेर राहणारे मतदार असे तुम्हाला म्हणायचे आहे का ? अशी विचारणा केली. त्यानंतर विलास भुमरे यांनीही लगेचच दुरुस्ती करत, माझ्या मतदारसंघातील स्थलांतरित झालेले २० हजार मतदार मी मतदानावेळी बाहेरून आणले आणि त्यांच्याकडून मतदार करून घेतले, असे ते म्हणाले.