अजिंठा लेणींच्या महसुलात फर्दापूर ग्रामपंचायतीला २० टक्के वाटा ? file photo
छत्रपती संभाजीनगर

अजिंठा लेणींच्या महसुलात फर्दापूर ग्रामपंचायतीला २० टक्के वाटा ?

जिल्हा परिषदेत ठराव मंजूर; शासनाच्या निर्णयाकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

Will the Fardapur Gram Panchayat get a 20% share of the revenue from the Ajanta Caves?

फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या परिसरातील फर्दापूर गावाच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. अजिंठा लेणीतून मिळणाऱ्या महसुलातील २० टक्के हिस्सा फर्दापूर ग्रामपंचायतीला द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या माहीन इद्रिस मुलतानी यांनी मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत केली. सभागृहाने ही मागणी मान्य करत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा ठराव मंजूर केला.

अजिंठा लेणीतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत असला, तरी मुख्य प्रवेशद्वार असलेल्या फर्दापूर ग्रामपंचायतीला त्याचा कोणताही आर्थिक लाभ मिळत नसल्याची बाब मुलतानी यांनी सभागृहात मांडली. तसेच पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मालमत्तांवरूनही ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळत नसल्याने विकासकामांसाठी निधीची कमतरता भासत असल्याचे त्यांनी सांगितले.

फर्दापूर येथे पर्यटन विकास महामंडळाची पर्यटक निवासस्थाने, व्हिजिटर सेंटर, व्यापार संकुल, वाहनतळ, हेलीपॅड तसेच विविध शासकीय इमारती असूनही स्थानिक ग्रामपंचायतीला त्यातून कोणताही महसूल मिळत नाही. परिणामी रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा व इतर नागरी सुविधांवर परिणाम होत असल्याचे सभागृहात नमूद करण्यात आले.

महसुलातील २० टक्के हिस्सा मिळाल्यास रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व पर्यटनपूरक सुविधांच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षांनी मागणी रास्त असल्याचे मान्य करत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा ठराव मंजूर केला. यापूर्वी ग्रामपंचायतीनेही अशी मागणी केली होती; मात्र ती फेटाळण्यात आली होती. आता जिल्हा परिषदेच्या ठरावामुळे या मागणीला नवे बळ मिळाले असून शासन काय निर्णय घेते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT