Wild Boars Rescued From Well  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Wild Boar Rescue Sillod |विहिरीत अडकलेल्या रानडुकरांना जीवदान: सहा तासांच्या थरारक मोहिमेनंतर सुखरूप सुटका

वनविभाग आणि मॅनविथइंडीज फाउंडेशनच्या पथकाची कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

Wild Boars Rescued From Well

सिल्लोड : मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या रानडुकरांच्या संपूर्ण कुटुंबाला वनविभाग आणि मॅनविथइंडीज फाउंडेशनच्या वन्यजीव बचाव पथकाने सहा तासांच्या अथक प्रयत्नांतून जीवदान दिले. वांगी परिसरातील पाण्याने पूर्ण भरलेल्या खोल विहिरीत पडलेल्या रानडुकरांची पहाटे तीन वाजता सुरू झालेली बचावमोहीम सकाळी नऊ वाजता यशस्वी झाली. विशेष म्हणजे, या मोहिमेत एकाही वन्यप्राण्याची जीवितहानी झाली नाही. सर्वांची सुखरूप सुटका करून त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

वांगी परिसरातील एका शेतकऱ्याच्या निदर्शनास विहिरीत रानडुकरे पडल्याची बाब आल्यानंतर त्यांनी तत्काळ गावकऱ्यांच्या मदतीने वनविभागाला माहिती दिली. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने रानडुकरांचे संपूर्ण कुटुंब जीव वाचविण्यासाठी धडपडत होते. घटनेचे गांभीर्य ओळखून वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. तांबे यांनी मॅनविथइंडीज फाउंडेशनच्या सुसज्ज वन्यजीव बचाव पथकाशी संपर्क साधत तातडीने बचावकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

माहिती मिळताच आवश्यक साहित्य व उपकरणांसह बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. खोल विहीर, पाण्याची पातळी आणि वन्यप्राण्यांची सुरू असलेली धडपड यामुळे बचावकार्य आव्हानात्मक होते. मात्र, योग्य नियोजन, सुरक्षित बचाव तंत्र आणि वनविभाग व बचाव पथकातील समन्वयाच्या बळावर एकेक करून सर्व रानडुकरांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

या बचाव मोहिमेत मॅनविथइंडीज फाउंडेशनचे मनोज गायकवाड, मानद वन्यजीव रक्षक तथा संस्थेचे संचालक आर्किटेक्ट आशिष जोशी, हर्ष केवारे यांच्यासह वनविभागाचे वनरक्षक साईनाथ पवार आणि विलास नरवाडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

दरम्यान, घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला देऊन बचावकार्यासाठी सहकार्य करणारे भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विशाल मुरकुटे, सरपंच कोंडीबा शेळके, ग्रामपंचायत सदस्य संतोष दांडगे, लक्ष्मण मुरकुटे, रामू मुरकुटे, विकास मुरकुटे आणि सचिन मुरकुटे यांनीही पुढाकार घेतला. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळेच वनविभागाला वेळेत माहिती मिळाली आणि बचावकार्याला गती मिळाली.

तब्बल सहा तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी नऊ वाजता सर्व रानडुकरांची सुखरूप सुटका झाली. आवश्यक निरीक्षणानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. एका मुक्या जीवाचे प्राण वाचविण्यासाठी दाखविलेली ही सामूहिक तत्परता आणि संवेदनशीलता कौतुकास्पद ठरली.

मुक्या जीवांच्या रक्षणासाठी माणुसकी जागी असणे गरजेचे!

विहिरीत पडलेल्या वन्यप्राण्यांना वाचविण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून धोकादायक प्रयत्न न करता तातडीने वनविभागाला माहिती द्यावी. वांगी येथील या घटनेने ग्रामस्थांची सतर्कता, वनविभागाची तत्परता आणि बचाव पथकाचे कौशल्य यांचा सुंदर समन्वय अधोरेखित केला. वन्यजीवांचे संरक्षण ही केवळ वनविभागाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे, हाच मोलाचा संदेश या मोहिमेतून मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT