Crime News : परपुरुषाला हाताशी धरून पत्नीची पतीला मारहाण file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : परपुरुषाला हाताशी धरून पत्नीची पतीला मारहाण

बेगमपुरा परिसरात एका पत्नीने आपल्या पतीचा अतोनात छळ करून त्याला घरातून हाकलून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Wife assaults husband with the help of another man

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा बेगमपुरा परिसरात एका पत्नीने आपल्या पतीचा अतोनात छळ करून त्याला घरातून हाकलून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. केंद्र सरकारच्या खात्यात चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेल्या एका ५० वर्षीय इसमाला पत्नीने परपुरुषाला हाताशी धरून बेदम मारहाण केली आणि घराबाहेर काढले. त्यामुळे स्वतःचे हक्काचे घर असतानाही या सरकारी कर्मचाऱ्यावर आपल्या ८१ वर्षीय वृद्ध आईसह भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिस आयुक्त आणि बेगमपुरा पोलिसांकडे धाव घेऊन निवेदन सादर केले असून, संबंधितांवर कारवाई करून स्वतःचे घर परत मिळवून देण्याची मागणी केली आहे.

तक्रारदार ५० वर्षीय इसम हे केंद्र सरकारच्या खात्यात नोकरीला असून ते पत्नी, उच्चशिक्षित मुलगा, मुलगी आणि आई यांच्यासह राहत होते. मात्र, काही काळापूर्वी त्यांच्या पत्नीची एका परपुरुषासोबत ओळख झाली. यावरून पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होऊ लागले. संबंधित कर्मचाऱ्याने स्वतः बँक कर्ज काढून बेगमपुरा भागात घर खरेदी केले होते आणि त्याचे मासिक हप्तेही ते स्वतःच भरत आहेत.

तरीही पत्नी त्यांना घरात राहू देत नसल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे. पती-पत्नीमधील वाढत्या वादामुळे हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात गेले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर १० सप्टेंबरपासून ते पुन्हा एकत्र राहू लागले. मात्र, घरात राहतानाही त्यांना साधे जेवणही मिळत नव्हते. संपूर्ण घरखर्च स्वतः करत असतानाही छळ थांबला नाही.

पती-पत्नीमधील वादामुळे बँकेच्या गृहकर्जाचे हप्ते थकले होते. त्यामुळे बँकेने घर जप्तीची नोटीस बजावली होती. या नोकरदाराने बँकेचे थकीत १ लाख ४२ हजार रुपये भरले आणि घराची जप्ती टाळली. मात्र, काही दिवसांतच पत्नीने परपुरुषाच्या मदतीने त्यांना २ ऑक्टोबर रोजी बेदम मारहाण करत घरातून हाकलून दिले.

पत्नीच्या या जाचाला कंटाळून अखेर त्यांनी पोलिस आयुक्त आणि बेगमपुरा ठाण्यात निवेदन दिले आहे. माझा छळ करणाऱ्या पत्नी व त्या परपुरुषावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि माझ्या स्वतःच्या मालकीचे मूळ घर तरी मला परत मिळवून द्यावे, अशी आर्त मागणी त्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT