Marathwada Flood : मराठवाड्यात का निर्माण झाली पूरस्थिती? Pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada Flood : मराठवाड्यात का निर्माण झाली पूरस्थिती?

जायकवाडीसह सर्व प्रमुख धरणे भरली, रेकॉर्डब्रेक पावसामुळे मराठवाड्यात शेतवस्त्यांमध्ये पाणी

पुढारी वृत्तसेवा

Why did the flood situation occur in Marathwada?

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा

मराठवाड्यात झालेली अतिवृष्टी आणि धरणातील पाण्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातही पैठणजवळ असणार्‍या जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात सोडले जाणारे पाणी थेट संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यांपर्यंत जाते. जायकवाडीतून सोडल्या जाणार्‍या पाण्यामुळे नांदेडपर्यंत पुराचा फटका बसला आहे.

गोदावरी नदीच्या काठावर असणारे पैठण शहर हे संत एकनाथांच्या वास्तव्यामुळे पुनित झाले आहे. दक्षिण काशी अशी ओळख असणार्‍या या शहरातून गोदावरी वाहते. गोदावरीवरच जायकवाडी धरणाची निर्मिती झाली आहे.

जयकुचीवाडीवरून स्थलांतर

वास्तविक पैठण आणि जायकवाडी या नावाचा तसा अर्थाअर्थी काही संबंध नाही. गोदावरी नदीवर धरण बांधले जावे ही निजामकालीन संकल्पना होती. निझाम गेल्यानंतर बीड जिल्ह्यातील ‘जयकुचीवाडी’ या खेड्याजवळ धरण बांधण्याचे ठरले होते. (परतूर आणि माजलगावजवळील खेडे) जयकुचीवाडीचा अपभ्रंश होत जायकवाडी झालेे. पुढे संयुक्‍त महाराष्ट्रात मराठवाडा आल्यानंतर तज्ञांनी अभ्यास केल्यानंतर हे धरण जयकुचीवाडीऐवजी वरील बाजूस असलेल्या पैठण येथे बांधायचे निश्चित झाले. अर्थात जागा बदलली तरी धरणाचे नाव मात्र कायम ठेवण्यात आले.

इंदिराजींनी केले उद्घाटन

या धरणाचा प्राथमिक आराखडा 1964 साली पूर्ण झाला. शंकरराव चव्हाण यांनी धरणाची निर्मिती व्हावी यासाठी भरपूर प्रयत्न केले. तेव्हा त्यांच्याकडे सुदैवाने पाटबंधारे खातेही होते. आशियातील मातीच्या सर्वात मोठ्या धरणांपैकी एक धरण म्हणून जायकवाडीची ओळख आहे. धरणाचे एकूण पाणलोट क्षेत्र 21,750 किमी असून 27 दरवाजे आहेत. धरणाच्या विशालतेमुळे जायकवाडीला नाथसागर धरण असेही संबोधिले जाते. या धरणाची पायाभरणी तत्कालिन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी 18 ऑक्टोबर 1965 रोजी केली होती. धरणाच्या उद्घाटनम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 24 फेब्रुवारी 1976 रोजी केले होते. 1974 पासून धरणात पाणी येण्यास प्रारंभ झाला. उद्घाटन झाले त्यावर्षी धरणात 40 टीएमसी पाणीसाठा होता.

नाशिकवर भिस्त

जायकवाडीची सारी भिस्त ही नाशिकच्या गंगापूर धरणावर आहे. वास्तविक जायकवाडीच्यावर धरणे नकोत अशी भूमिका शंकररावांची होती. परंतु त्यास न जुमानता नगर, नाशिककरांनी धरणे बांधली. त्यातील गंगापूर धरण भरले तरच त्याचे पाणी गोदापात्रात सोडले जाते. याशिवाय नाशिक, नगरमधील पांडवदरा, भंडारदरा, निळवंडे, दरेगाव, समशेरपूर, चासकमान आणि दारणा ही धरणे आहेत, जी गोदावरी व तिच्या उपनद्यांवर बांधलेली आहेत. ही धरणे गोदावरी नदीच्या खोर्‍यात असून, या धरणांमधून पाणी सोडल्यासच जायकवाडी धरणाला पाणी उपलब्ध होते. त्यामुळे जायकवाडीवरून संभाजीनगर आणि नाशिकचा संघर्ष हा नेहमीच सुरू असतो. जायकवाडीचा इतिहास पाहता आतापर्यंत ते फक्‍त 15 वेळा शंभर टक्के भरले आहे. 2015 साली धरणात केवळ 12 टक्के पाणीसाठा होता.

यंदा मात्र वरूणराजाने कमाल केली. गंगापूर व जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात सतत होत असलेल्या पावसामुळे जायकवाडीचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. परिणाम पैठणच्या गोदापात्रात सोडले जाणारे पाणी डावा, उजवा कालवा तसेच पात्रामधून थेट नांदेडपर्यंत पोहचले आहे. याशिवाय सिद्धेश्‍वर, येलदरी, मांजरा, लोअर तेरणा, सीना कोळेगाव, माजलगाव ही प्रमुख धरणे व अन्य छोटे प्रकल्प पावसामुळे भरून ओसंडून वाहत असल्याने मराठवाडा पूरस्थितीला सामोरा जात आहे. 1 जूनपासून आतापर्यंत मराठवाड्यात सरासरीपेक्षा 124% जास्त पाऊस झाला आहे. 22 सप्टेंबरपर्यंत सरासरी 604 मिमी पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात 747 मिमी पाऊस झाला आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यात 165% पाऊस झाला आहे, त्यातच पुन्हा अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला असल्याने खरोखरच अंदाज खरा ठरला तर मराठवाड्याती परिस्थिती भयावह होण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT