Who will get the opportunity in the reserved OBC seats?
राजू वैष्णव
सिल्लोड : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आरक्षित ओबीसी जागांवर संधी कुणाला ? कुणबी मराठा की मूळ ओबीसींना ? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. तर ओबीसी आरक्षित जागांवर कुणबी मराठा व मूळ ओबीसी असे दोन्हीकडून इच्छुक असल्याने नेत्यांसमोरही पेच निर्माण झालेला आहे.
या निवडणुकीत तालुक्यात एक गट, दोन गणांची वाढ झालेली आहे. यात अंभई गट तर धानोरा व केळगाव गणांची भर पडलेली आहे. नऊ गटातील शिवणा गट ओबीसी महिला तर नव्याने निर्मिती झालेला अंभई गट ओबीसीसाठी राखीव झालेला आहे. अठरा गणांमधील निल्लोड व उंडणगाव गण ओबीसी, तर केहऱ्हाळा व अंभई गण ओबीसी महिला आरक्षित झालेला आहे. गट, गणांचे आरक्षण जाहीर झाल्यापासून इच्छुक कामाला लागलेले आहे.
तर आरक्षित जागांवर लढण्यासाठी काही इच्छुकांनी आधीच जात प्रमाणपत्रांची सोय करून ठेवली आहे. असे असले तरी आरक्षित ओबीसी जागांवर आता संधी कुणाला ? कुणबी मराठा की मूळ ओबीसींना? अशी चर्चा रंगत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्द्यापासून राजकारणात मराठा विरुद्ध ओबीसी असा नवा वाद पाहायला मिळत आहे.
यामुळे ओबीसीच्या आरक्षित जागांवर उमेदवारी देताना भाजपसह शिवसेनेच्या नेत्यांना आगामी राजकारण डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यावा लागणार आहे, हे मात्र निश्चित. भवन, अंधारी, घाटनांद्रा या ओपन महिला आरक्षित जागांवर शिवसेनेचे उमेदवार जवळपास ठरले आहे. तर आरक्षण जाहीर झाल्यापासून भवन गटाचा उमेदवार ठरलेला असल्याने भाजपने आधीच आघाडी घेतलेली आहे. अंधारी, घाटनांद्रा गटात भाजपकडून अजूनही चाचपणीच केली जात आहे. तर शिवसेनेचे उमेदवार ठरल्याची चर्चा आहे. ओपन असलेले डोंगरगाव, भराडी गटात शिवसेनेचे उमेदवार निश्चित झाले असून इच्छुक वाढल्याने भाजपची डोकेदुःखी वाढली आहे. ओपन महिला अजिंठा गटात भाजप-शिवसेनेकडून चाचपणी सुरु आहे. या गटात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी असल्याने शिवसेनेकडून मुस्लिम चेहरा दिसण्याची शक्यता आहे. उंडणगाव गट एसटी आरक्षित असून भाजप-शिवसेना सक्षम उमेदवारांचा शोध घेत आहे.
भावींची भाऊगर्दी वाढली
जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्यापासून इच्छुक कामाला लागलेले आहे. निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तसे-तसे इच्छुकांची संख्या वाढली आहे. तर सध्या सोशल मीडियावर भावींची भाऊगर्दी चांगलीच आहे. पक्षाने उमेदवारी नाकारलेले इच्छुक उमेदवार ऐनवेळी महाविकास आघाडीचा आधार घेतील, अशी चर्चाही चर्चिली जात आहे. महाविकास आघाडीचे उमेदवारही रिंगणात दिसणार असल्याने तिरंगी, चौरंगी लढती होण्याची चिन्हे आहेत.