Who will benefit from a large turnout, and whose political calculations will be ruined?
सुनील मरकड
खुलताबाद : जिल्ह्यातील न.प. निवडणुकांमध्ये शहराने यंदा सर्वाधिक मतदान करून विक्रम नोंदवला असून. अनेक वर्षांपासून येथे मतदानाचा आकडा ६५ टक्क्यांच्या आसपासच स्थिरावत होता. पण यंदा नागरिकांनी मोठ्या उत्साहाने मतदान करत घवघवीत ८२.२६% मतदानाची नोंद केली आहे. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता कमालीची वाढली आहे.
वाढलेल्या मतदान टक्केवारीचा कोणत्या पक्षाला लाभ होणार आणि कोणाचा गणित बिघडणार यावर शहरातील चौकात, चहाच्या कट्यांवर आणि पक्षांच्या कार्यालयात जोरदार चर्चा सुरू आहे. टक्केवारीत झालेली झपाट्याने वाढ म्हणजेच नवमतदार, महिला, युवक आणि शांत मतदारांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याचे संकेत मानले जात आहेत.
त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये नवीन समीकरणे दिसून येण्याची दाट शक्यता आहे. हे विक्रमी मतदान महायुतीला फायदेशीर ठरणार की विरोधकांच्या प्रचाराचे फळ मिळणार याचा अंदाज उमेदवारांसह कार्यकर्ते घेत आहेत. काही प्रभागांत तीव्र चुरस असल्याने अपेक्षित नसलेले निकालही समोर येऊ शकतात, अशी चर्चा होत आहे.
त्यामुळे हे मतदान कोणासाठी संधी तर कोणासाठी धोक्याचे घंटानाद ठरेल, हे येणारा काळ आणि अंतिम निकालच स्पष्ट करणार आहे. कोणता उमेदवार निवडून येणार याचा अंदाज चांगल्या चांगल्याला लावता येत नाही. निवडणुकीत उतर-लेल्या उमेदवारांनी प्रभागनिहाय आखलेल्या रणनीतीचे फळ मिळणार का याबाबत नेत्यांमध्येही कौल मांडले जात आहेत. अनेक प्रभागांमध्ये चुरशीची लढत असल्याने निकाल अनपेक्षित येण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
उत्सुकता वाढली
यंदाच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त मतदान झाले. हाय व्होल्टेज टक्केवारीचा फायदा मिळणार, यावर गल्लीबोळापासून ते राजकीय कार्यालयांपर्यंत चर्चा सुरू आहे. निकाल लागेपर्यंत या उत्सुकतेचे तापमान असेच वाढत जाणार आहे.