धोकादायक इमारतींवर मनपा कारवाई करणार कधी ? file photo
छत्रपती संभाजीनगर

धोकादायक इमारतींवर मनपा कारवाई करणार कधी ?

प्रशासनाकडून दरवर्षी नुसतेच मान्सूनपूर्व नोटीस देण्याचेच सोपस्कार

पुढारी वृत्तसेवा

When will the Municipal Corporation take action against dangerous buildings?

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भाई-दादांनी चमकोगिरीसाठी लावलेले अनधिकृत बॅनर काढताना मनपा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अनधिकृत बॅनरबाजीनंतर प्रशासनाने इतर धोकादायक बाबींमध्येही तितकीच दक्षता घेणे अपेक्षित आहे. मात्र शहरातील मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतींवर कारवाईच्या बाबतीत मनपा प्रशासन पुन्हा एकदा मान्सूनपूर्व नोटीस देण्याचेच सोपस्कार पार पाडणार की थेट कारवाईचा बडगा उगारणार, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मनपाकडून जीर्ण व धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीस बजावल्या जातात. स्वतःहून दुरुस्ती किंवा पाडकाम न केल्यास मनपामार्फत कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला जातो. प्रत्यक्षात अनेक इमारती आजही उभ्याच असून, त्यात व्यवसाय व वर्दळ सुरू आहे.

त्यामुळे संभाव्य दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे. जुन्या शहरातील सिटी चौक येथील फुलबाजारसह अनेक भागांतील इमारती पूर्णपणे जीर्ण अवस्थेत उभ्या आहेत. भिंतींना तडे, छताची झीज आणि पडझडीची चिन्हे स्पष्ट दिसत असतानाही ठोस कारवाई झालेली नाही.

प्रशासनाकडून केवळ नोटीस देऊन जबाबदारी झटकण्याची पद्धत कायम असल्याची टीका व्यापारी व नागरिक करत आहेत. मान्सून सुरू झाल्यानंतरच हालचाल करणे, ही पद्धत जीवघेणी ठरू शकते. पावसाच्या पहिल्याच सरीत एखादी इमारत कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पदाधिकाऱ्यांनी तरी लक्ष द्यावे नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासनावर ठोस कारवाईसाठी दबाव आणावा, अशी मागणी होत आहे. मान्सूनची वाट न पाहता तातडीने सर्वेक्षण, पाडकाम आणि सुरक्षात्मक उपाययोजना राबविण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT