What is the relationship of RSS founder Dr. Hedgewar with Kandakurti village near Nanded district?
छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाला विजयादशमीपासून प्रारंभ झाला आहे. पण आपणास हे माहिती आहे का, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळिरामपंत हेडगेवार यांचे मूळ गाव कंदकुर्ती हे मराठवाडा - तेलंगणा सीमेजवळच आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबादपासून सोळा किमी अंतरावर असणार्या कंदकुर्तीत संघाचे विविध उपक्रम राबविले जातात.
कंदकुर्ती हे तेलंगणातील निझामाबाद जिल्ह्यात असून, या गावाला धार्मिक व ऐतिहासिक महत्व आहे. गोदावरी, मंजीरा, हरिद्रा या तीन नद्यांचा संगम असल्याने त्रिवेणी संगम म्हणून कंदकूर्ती ओळखले जाते. त्रिवेणी नद्यांचा संगम ’वंजरा-संगम’ या नावाने न प्रसिद्ध आहे. या संगमास ’गरुडगंगा’ असेही नाव असून पवित्र स्नानासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. या संगमावर अहिल्याबाई होळकर यांनी एक उत्तम घाट व महादेवाचे मंदिर नदीच्या तीरावर बांधले. निजामाबाद (पूर्वीचे नाव इंदूर) हे जिल्ह्याचे ठिकाण या गावापासून 30 किमी पश्चिमेला आहे.
कंदकुर्ती हे डॉक्टरांचे मूळ गाव असले तरी डॉक्टरांचा जन्म नागपूरचा. त्यांच्या चार पिढ्या अगोदरपासूनच नागपुरात स्थायिक झाल्या. डॉक्टराचे पणजोबा नरहरशास्त्री हे कंदकुर्तीहून नागपुरात अठराव्या शतकात स्थायिक झाल्याचे सांगण्यात येते. तेव्हा शास्त्री आपल्या नावासमोर हेडगे लावत. पुढे ते हेडगेवार झाले. (संदर्भ : मराठी शब्दकोष). संघ संस्थापकांचा गावाशी थेट संबंध आला नसला तरी ते डॉक्टरांचे मूळ गाव असल्याने देशभरातून स्वयंसेवक हे ठिकाण पाहण्यासाठी येतात.
कंदकुर्तीला अध्यात्मिक वारसाही आहे. गावात अनेक मंदिरे आहेत. त्यातील श्रीराम व केशवमूर्ती (भगवान विष्णू) प्रमुख. केशवमूर्ती हे हेडगेवारांचे कुलदैवत प्रथम भुयारात होते. तेथून ती मूर्ती बाहेर काढण्यात आली. केशवमूर्तीचा वारसा असल्यानेच बळीरामपंत हेडगेवारांनी आपल्या मुलाचे नाव ’केशव’ ठेवल्याचे म्हटले जाते. कंदकुर्ती येथे गोदाकाठावर भिल्लांचे एक तीर्थस्थान आहे. भिल्ल अथवा ’किरात’ व स्कंदपुरीचे ’स्कंद’ या दोन नावांवरून ’स्कंद-किरात’ व त्याचे ’स्कंद किराती’ होऊन शेवटी अपभ्रंशित उच्चार ’कंदकुर्ती’ झाला असावा. तसेच कन्नड भाषेच्या प्रभावाने ’कंद - कुडती’ पासून ’कंदकुर्ती’ शब्द आला असण्याची शक्यता आहे. कन्नड भाषेत ’कंद’ म्हणजे गड्डा किंवा टेकडी व ’कुडती’ म्हणजे वसलेला; यावरून ’टेकडीजवळ वसलेले’ असाही ’कंदकुर्ती’ चा अर्थ निघतो.
सेवाभारतीच्या वतीने कंदकुर्ती पंचक्रोशीत शैक्षणिक, आरोग्य, ग्रामविकासाचे प्रकल्प राबविले जातात. केशव सेवा समिती हा ट्रस्ट स्थापन करण्यात आला असून, ट्रस्टचे सदस्य रवींद्र पोतगंटीवार यांनी सांगितले, की हेडगेवार कुटुंबीयांचे कुलदैवत असणारे प्राचीन मंदिर आहे. केशवराय हे देवतेचे नाव. कुलदेवतेशिवाय डॉ. हेडगेवार आणि भारतमातेची प्रतिमा मंदिरात आहे. मंदिरांचे पुननिर्माण जवळपास पूर्ण झाले आहे. प्राचीन राम मंदिर गावात आहे. डॉक्टरांची प्रेरणा कायम रहावी म्हणून विघ्नेश्वर मंदिर, स्कंदमाता मंदिर, रुक्मिणी मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. समितीमार्फत भव्य वास्तुची उभारणी अंतिम टप्प्यात असून, वाचनालय, संग्रहालय, संघ पदाधिकार्यांची निवास व्यवस्था केली जाईल. समितीमार्फत कंदकूर्ती येथे केशव शिशु मंदिर शाळा कार्यरत असून, कौशल्य विकासाकडे विशेष लक्ष दिले जाते. शताब्दी वर्षानिमित्त आगामी काळात वैश्विक संमेलन घेण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
कंदकुर्तीत 65 टक्के मुस्लिम आणि 35 टक्के हिंदू आहेत. हे सर्वजण सलोख्याने राहतात. कानडी, तेलगू , मराठी, हिंदी या चार भाषा जाणणारे लोक गावात आहेत. समितीच्या वतीने चालत असलेल्या शाळेत मुस्लिम विद्यार्थीही आहेत. संघाचे ज्येष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांच्या पुढाकाराने कंदकुर्तीत सेवा प्रकल्प सुरू झाले. संघाच्या वतीने 2017 साली कंदकुर्तीवर चित्रफित तयार करण्यात आली होती. त्यात विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कंदकुर्तीची संक्षिप्त ओळखही करून दिली आहे. धर्माबाद रेल्वेस्थानकावर कंदकुर्तीसाठी उतरावे असा उल्लेख असणारा फलक आहे. धर्माबाद स्थानकाला डॉ. हेडगेवारांचे नाव द्यावे, अशी मागणीही मध्यंतरी पुढे आली होती. खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर करून राष्ट्रीय महामार्गाशी कंदकुर्ती जोडावे असे निवेदन दिले होते.