चिकलठाणा, जाफरगेटचा आठवडी बाजार होणार बंद file photo
छत्रपती संभाजीनगर

चिकलठाणा, जाफरगेटचा आठवडी बाजार होणार बंद

पीर बाजाराचाही समावेश; महापालिका आयुक्तांनी मांडली भूमिका

पुढारी वृत्तसेवा

Weekly markets at Chikalthana and Jafergate to be closed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेकडून : चिकलठाणा, जाफरगेट आणि पीर बाजार (सोमवारचा) आठवडी बाजार लवकरच बंद केले जाणार आहे. या बाजारांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघात घडत असल्याचे सांगून आयुक्त जी. श्रीकांत यांनी बुधवारी (दि. २५) स्थायी समितीच्या अर्थसंकल्पीय सभेत तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या या निर्णयामुळे शहरातील शेकडो भाजीपाला विक्रेते अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महापालिका प्रशासनाने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक तयार करून आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांच्याकडे सादर केले. अंदाजपत्रक सादर करताना आयुक्तांना विविध विभागांवर होणाऱ्या जमा-खर्चाचा तपशीलही मांडला. मात्र या अर्थसंकल्पात आठवडी बाजारांना उत्पन्नाच्या स्त्रोतून वगळले आहे.

याबाबत बोलताना आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले की, आठवडी बाजारांमुळे शहरात वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे शहरातील चिकलठाणा, जाफरगेट आणि शहानुरमिया दर्गा भागात पीर बाजार येथील आठवडी बाजार लवकरच बंद केले जातील, असेही त्यांनी सांगितले. मात्र आता आठवडी बाजारातील फिरत्या विक्रेत्यांसह शहरालगतच्या परिसरातून ताजी भाजी घेऊन विक्रीसाठी येणारे शेतकरी या निर्णयामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

बाजारात मिळतो स्वस्त भाजीपाला

प्रत्येक बाजारात साधारणपणे २५ ते ५० लाख रुपयांची उलाढाल होते. आठवडी बाजारात खरेदीसाठी शहरातील नागरिक मोठी गर्दी करतात. ताजा भाजीपाला स्वस्तात मिळत असल्याने आठवडाभराचा भाजीपाला, फळे, कडधान्य, धान्य घेऊन जातात.

आता भाजीमंडईतच भरणार बाजार

आठवडी बाजाराऐवजी आता मनपाच्या विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या भाजी-मंडईमध्ये अस्तित्वात असलेल्या गाळ्यांमध्ये भाजी बाजार भरविण्यास मान्यता देण्यात येणार आहे. तसे संकेतही आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT